युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 03:22 PM2022-03-07T15:22:52+5:302022-03-07T15:27:02+5:30

Russia Ukrain War: या युद्धाला नाटाे देश आणि अमेरिका जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी दिली.

Russia Ukrain War will continue for another 2 months; scientist Rajesh Muneshwar claims to have returned to India from Ukraine after miles of deadly walk | युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा

युद्ध आणखी २ महिने चालेल; युद्धभूमी युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचा दावा

googlenewsNext

- अनुराग पाेवळे
नांदेड - तब्बल १६ वर्षांपुर्वी भारत साेडून युक्रेनमध्ये (Russia Ukrain War) स्थायिक झालेले राजेश मुनेश्वर हे शुक्रवारी आपल्या कुटूंबियांसह भारतात परतले आहेत. वैज्ञानिक म्हणून काम करत असलेल्या त्यांच्या स्पेस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटरला रशियाच्या बाॅम्ब हल्ल्यात नष्ट केले आहे. घराजवळही अनेक मिसाईल हल्ले त्यांनी पाहिले. या युद्धभूमीतून जीवघेणी पायपीट करत ते राेमानियात पाेहाेचले. तेथून ते दिल्लीत आले आहेत. दरम्यान, भारताच्या सीमेवरील नेपाळ देशात दुसऱ्या देशाने अण्वस्त्र तैनात केले असते तर भारताची भुमिका काय असती, असा प्रश्न करीत हे युद्ध आणखी दाेन महिने तरी सुरू राहिल, अशी भीती मुनेश्वर यांनी व्यक्त केली.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या सिरंजणी येथील मुळ रहिवाशी असलेले राजेश मुनेश्वर यांनी आपले शिक्षण नागपूर येथे पुर्ण केले. त्यानंतर ते युक्रेनमधून काॅलेज युनिर्व्हसिटी येथे उच्च शिक्षण पुर्ण केले. तेथेच ते स्थायिक झाले. १६ वर्षांपुर्वी त्यांनी देश साेडला हाेता. काही दिवस रशियातील माॅस्काे येथे वास्तव्य केल्यानंतर ते युक्रेनमध्ये स्पेस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. इंडाे-युक्रेन या प्रकल्पाअंतर्गत ते वैज्ञानिक म्हणून काम करत हाेते. मात्र, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ते राहत असलेल्या कीव्ह शहरावर रशियाने हल्ले सुरू केले. या हल्ल्याचा अनुभव त्यांनी स्वत: घेतला. ते काम करत असलेल्या स्पेस सेंटरलाही रशियाने लक्ष्य केले. घराजवळही बाॅम्ब हल्ले झाले. या बाॅम्ब हल्ल्याचे अगदी बालकनीतून ते साक्षीदार हाेते.

सरकारच्या सुचनेनंतर त्यांनी कुटूंबियांसह शहर साेडले. दाेन दिवस प्रवास करत ते रेल्वे स्टेशनवर पाेहाेचले असता तेथे स्थानिक विरूद्ध परदेशी असा भेदभाव केला जात हाेता. स्थानिकांना अगाेदर शहराबाहेर काढले जात हाेते. चर्चेन शहरातून लहानग्या बाळाला घेवून बर्फ पडत असताना त्यांनी जीवघेणी पायपीट केली. साेळा तासांचा बसप्रवास करून ते बाॅर्डर क्राॅस करून राेमानियात पाेहाेचले. राेमानियात उभारलेल्या आश्रयस्थळी थांबले. तेथून भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तेथे केंद्रीय मंत्री ज्याेतिरादित्य शिंदे यांनीही तेथे मदत केली. सुचाओ विमानतळावरून त्यांनी भारताकडे झेप घेतली. भारतात दिल्लीत उतरल्यानंतर ते नागपूरला पाेहाेचणार आहेत. या सर्व प्रवासात त्यांच्या पत्नी रेखा मुनेश्वर व लहान बाळही हाेते.

युद्धाला अमेरिका, नाटाे देश जबाबदार
या युद्धाला नाटाे देश आणि अमेरिका जबाबदार असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी दिली. रशियाकडून युक्रेनला वारंवार इशारे दिले जात हाेते. मात्र, अमेरिका आणि नाटाे देशांच्या बळावर युक्रेनने त्याकडे दुर्लक्षच केले. भारताच्या सीमेवरील नेपाळ देशात अण्वस्त्र तैनात केले असते तर भारताची भुमिका काय असती, असा प्रश्न करीत रशियाने हे हल्ले केल्याचेही ते म्हणाले. हे युद्ध आणखी दाेन महिने तरी सुरू राहिल, असे त्यांनी सांगितले.

भारतात इस्त्राेशी संपर्क
भारतात आल्यानंतर आपण इस्त्राेसाेबत काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. याबाबत इस्त्राेशी संपर्क केल्याचेही ते म्हणाले. डीआरडीओ साेबतही काम करण्यास आपण तयार आहाेत. अंतराळ यानासाठी काम करण्यास आपण इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Russia Ukrain War will continue for another 2 months; scientist Rajesh Muneshwar claims to have returned to India from Ukraine after miles of deadly walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.