सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 01:29 PM2020-08-22T13:29:18+5:302020-08-22T13:54:59+5:30

जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे.

Pleasant! In the dam project area in Marathwada, rain is also favorable this year | सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

googlenewsNext
ठळक मुद्देविष्णूपुरी प्रकल्पातून ७६.१५ क्युसेक विसर्ग जायकवाडीत ७२.४६, तर येलदरीमध्ये ९९.२९ टक्के साठा

- विशाल सोनटक्के 

नांदेड : बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प वगळता इतर प्रमुख धरणांत यंदा समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने मराठवाडा सुखावल्याचे चित्र आहे.  दरम्यान, यंदा पावसाने प्रमुख प्रकल्प परिसरातही चांगलीच मेहेरबानी दाखवली आहे. जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे.

जायकवाडी प्रकल्पात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७२.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा २१७१ दलघमी आहे. शुक्रवारपर्यंत या प्रकल्पात १५७३.०९ इतके पाणी उपलब्ध होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा-येलदरी प्रकल्प तुडुंब भरला असून या धरणात ९९.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी या धरणक्षेत्रात २१ आॅगस्टपर्यंत ४१३ मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा याच तारखेपर्यंत ६१० मि.मी. पाऊस कोसळला आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ८१० दलघमी असून शुक्रवारपर्यंत येथे ८०४.०३ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने धरणातून ४७७.९८ क्युमेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण क्षेत्रात मागीलवर्षी २१ आॅगस्टपर्यंत केवळ २७० मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा ६५६ मि.मी. पाऊस नोंदविला गेला असून शुक्रवारपर्यंत या धरणात ७१.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३१२ दलघमी आहे. शुक्रवार सकाळपर्यंत येथे २२३.७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. 

नांदेड जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प परिसरात मागील वर्षी ६५३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा या प्रकल्प क्षेत्रात ७९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शुक्रवारपर्यंत प्रकल्पात ८३.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. या प्रकल्पाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ९६४ दलघमी असून शुक्रवारी सकाळपर्यंत येथे ८०१.१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. 

बीड जिल्ह्यातील मांजरा या प्रकल्प क्षेत्रातही यंदा सुमारे दुप्पट पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षी २१ आॅगस्टपर्यंत या परिसरात १६८ मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा तेथे ३१६ मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, धरण अद्यापही कोरडे असून सद्य:स्थितीत तेथे ०.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाची प्रकल्पी उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७७ दलघमी असून शुक्रवारपर्यंत तेथे १.०६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. 

पूरप्रवण भागावर प्रशासनाचे लक्ष
- नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्पाची संकल्पित उच्चत्तम स्थिती ३५५ मीटर असून, शुक्रवारी सकाळपर्यंत तेथे ३५४ मीटर पाणीपातळी होती. त्यामुळे या प्रकल्पातून ७६.१५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. मराठवाड्यातील इतर पूरप्रवण ठिकाणावरही प्रशासन लक्ष ठेवून आहे.
- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील गोदावरीची इशारा स्थिती ४४०.४१ मी. आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत तेथे ४३२.२१ मी. पाणी होते. 
- बीड जिल्ह्यातील माजलगाव, तेलगाव रोड येथील सिंदफणा नदीची इशारा स्थिती ४१० मी. आहे. तेथे ४०२.८३ मी. वरून पाणी वाहत आहे. 
- परभणी जिल्ह्यातील धालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा स्थिती ३९६.४७ आहे. सध्या तिथे ३८६.५८ मीटर पाणीपातळी आहे. 
- नांदेडच्या गोदावरीवरील जुन्या पुलाची इशारा स्थिती ३५१ मीटर असून तेथे ३४३.१५ मीटरहून शुक्रवारी सकाळी पाणी वाहत होते. 

Web Title: Pleasant! In the dam project area in Marathwada, rain is also favorable this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.