अर्धापूर (जि. नांदेड): सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अर्धापूर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे ऐन काढणीच्या हंगामात हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. तालुक्यातील ज्वारी आणि गव्हासारखी उभी पिके जमिनीदोस्त झाली असून आंबा, केळी आणि चिकूच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
दाभड आणि रोडगी शिवारातील शेतीचे चित्र अत्यंत विदारक असून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
काढणीला आलेली पिके मातीत; आंबा-केळीचा सडारोडगी येथील शेतकरी शंकर गोविंदराव काकडे यांची एकरभर क्षेत्रातील काढणीला आलेली ज्वारी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. "एकरी खर्च करून पीक जोपासले होते, पण रात्रीच्या पावसाने सर्व काही मातीत मिळवले. आता जगावे कसे?" असा आर्त सवाल काकडे यांनी व्यक्त केला आहे. दाभड परिसरातही हीच स्थिती असून आशिष लोखंडे आणि सुरेशराव टेकाळे यांच्या आंबा बागेत फळांचा अक्षरशः सडा पडला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीची पाने फाटली असून पपई, चिकू आणि टरबूज यांसारख्या नगदी पिकांनाही मोठा तडाखा बसला आहे.
पंचनामे आणि भरीव मदतीची आर्त हाकवर्षभर मेहनत करून जोपासलेली फळे आणि पिके डोळ्यादेखत नष्ट झाल्याने तालुक्यातील शेतकरी बँकांचे कर्ज आणि उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत आहे. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी अर्धापूर तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.
Web Summary : Ardhapur farmers face ruin as unseasonal storms flatten crops like sorghum and wheat. Fruit orchards of mango, banana, and chickoo are devastated, leaving farmers in financial distress. Calls for immediate assessment and substantial aid rise.
Web Summary : अर्धापुर में बेमौसम तूफान ने ज्वार और गेहूं जैसी फसलों को बर्बाद कर दिया। आम, केले और चीकू के बागानों को भारी नुकसान हुआ, जिससे किसान आर्थिक संकट में हैं। तत्काल आकलन और पर्याप्त सहायता की मांग की जा रही है।