Nanded: 'मुलगी पाहायला' जाताना कुटुंबावर काळाचा घाला; भावी नवरदेव-बहीण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:29 IST2025-10-18T18:25:25+5:302025-10-18T18:29:19+5:30
दोन तास जखमी विव्हळत होते! गोजेगाव येथील अपघाताने नांदेड-नागपूर महामार्ग हादरला

Nanded: 'मुलगी पाहायला' जाताना कुटुंबावर काळाचा घाला; भावी नवरदेव-बहीण जागीच ठार
हदगाव (नांदेड):लातूर येथील एका कुटुंबावर नियतीने क्रूर खेळ केला आहे. आपल्या एकुलत्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर मुलासाठी 'जीवनसाथी' शोधण्याच्या आनंदाने चंद्रपूरला निघालेल्या या कुटुंबाला नांदेड-नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथे भीषण अपघाताचा सामना करावा लागला. या दुर्घटनेत मुलगी पाहायला निघालेला भावी नवरदेव मनोज दिघोरे (देवरे) आणि त्याची नातेवाईक मनीषा राचेवाड (रासेवाड) हे दोघे भाऊ-बहीण जागीच ठार झाले, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी आहेत.
मनोज दिघोरे याचे कुटुंब लातूर येथे राहते, तर त्याच्या दोन बहिणी पुण्याला. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याला मुलगी पाहण्यासाठी हे सर्व कुटुंब कारने (एमएच ०४ जीजे ७३०७) चंद्रपूरकडे जात होते. दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हदगाव तालुक्यातील गोजेगाव येथील पेट्रोल पंपासमोर तुळजापूर-नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक किंवा पर्यायी रस्ता दिलेला नव्हता. रस्त्यावर अचानक जेसीबी तोंड काढून उभी असताना, कारच्या पुढील आयशर गाडीने ब्रेक मारला, पण ती जेसीबीला धडकली. मागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने आयशरला इतकी जोरदार धडक दिली की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
आनंदाच्या प्रवासाचा शोकांतिका
या भीषण धडकेत कार चालवत असलेला मुलगा मनोज दिघोरे (सॉफ्टवेअर इंजिनियर) आणि त्याची नातेवाईक महिला मनीषा राचेवाड यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते, तर गाडीतील तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह आयशरचा चालक शाहरुख खान सुभान खान (वय ३४) आणि इतर सात ते आठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे स्वरूप एवढे भयंकर होते की, पाहणाऱ्यांनाही चक्कर येत होती. जखमींना दोन तास उलटूनही शुद्ध नव्हती. या दुर्घटनेत एका लहान मुलीसह, आई-वडील आणि इतर दोन बहिणी गंभीर जखमी आहेत.
गावकऱ्यांनी धाव घेतली, उपचार सुरू
अपघात होताच अंकुश बोधचे (बानेगाव सरपंच प्रतिनिधी), सुदर्शन आढाव, आशिष कल्याणकर यांच्यासह दत्ता पाटील, राजू तावडे, बालाजी ढोरे, गजानन देवसरकर, मिलिंद पाईकराव, गंगाधर काळे, शंकर जळके या तरुणांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात (हदगाव) दाखल केले, तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यानेच हा भीषण अपघात झाल्याची चर्चा परिसरात आहे. या घटनेमुळे लातूर आणि हदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.