'नांदेड ते ग्वाल्हेर व्हाया अमृतसर!' रेल्वेच्या पार्सल विभागाने दुचाकी १२ दिवस फिरवली; मालकाला मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:55 IST2026-02-18T14:50:28+5:302026-02-18T14:55:02+5:30
नांदेडच्या दुचाकीची १२ दिवस फुकट 'भारत भ्रमंती'; रेल्वेच्या अजब कारभाराचा ग्राहकाला फटका

'नांदेड ते ग्वाल्हेर व्हाया अमृतसर!' रेल्वेच्या पार्सल विभागाने दुचाकी १२ दिवस फिरवली; मालकाला मनस्ताप
नांदेड : रेल्वेच्या पार्सल विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडहून ग्वालियरला पाठविण्यात आलेली एमएच २६ सीजे ९१६५ क्रमांकाची दुचाकी तब्बल १२ दिवस मालकाच्या ताब्यात पोहोचली नाही. सचखंड एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी रोजी दुचाकी रवाना केली, नियमानुसार ती ८ फेब्रुवारीला ग्वालियर येथे उतरविणे अपेक्षित होते. मात्र, तेथील पार्सल विभागाने दुचाकी उतरवून घेतली नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दरम्यान, ९ फेब्रुवारीला परतीच्या प्रवासातही ती उतरवली गेली नाही आणि दुचाकी गेली तशी नांदेडला परत आली. १० फेब्रुवारीला पुन्हा ग्वालियरला पाठवली असता अमृतसरपर्यंत जाऊन परत पार्सल विभागाने तोच कित्ता पुन्हा गिरवला. अखेर १५ फेब्रुवारीला फिरोजपूर एक्स्प्रेसने पाठवल्यानंतरच दुचाकी अपेक्षित ठिकाणी पोहोचली. मात्र, यासाठी तब्बल १२ दिवस प्रतीक्षा संबंधित दुचाकी मालकाला करावी लागली. या काळात संबंधित मालकाला प्रचंड मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि वेळेची नाहक हानी सहन करावी लागली. या प्रकारामुळे रेल्वे पार्सल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
ना दाद ना फिर्याद
रेल्वे हे प्रवासाचे सुलभ, सुरक्षित व गतिमान साधन असले तरी या विभागाची आर्थिक भरभराट प्रवाशांपेक्षा माल वाहतुकीतून आहे. अशावेळी माल वाहतूक सेवेत तत्परता असणे अपेक्षित आहे. एक दुचाकी रेल्वेने पाठवायची झाल्यास त्यासाठी वातानुकूलित प्रथम श्रेणीच्या प्रवासाइतके भाडे आकारले जाते. मात्र वाहन असो की पार्सल अतिशय निष्काळजीपणे हाताळले जाते. पार्सल पाठवले म्हणजे आमची जबाबदारी संपली, तुमचे वाहन पोहोचले की नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नसल्याचे सांगून या विभागातील अधिकारी नामानिराळे होतात. केवळ पार्सल विभागच नव्हे तर रेल्वेमंत्री, रेल्वे मंत्रालयसुद्धा प्रवाशांच्या तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही.