Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:04 IST2025-08-29T20:03:40+5:302025-08-29T20:04:17+5:30

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर

Nanded: School bus stuck in flood water, 18 students saved by forming a human chain | Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं

Nanded: पुराच्या पाण्यात स्कूल बस अडकली, मानवी साखळी करून १८ विद्यार्थ्यांना वाचवलं

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी १७ मंडळात अतिवृष्टी व पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे. बिलोली नरसी रोड बंद झाला आहे. नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर स्कुलबस मध्ये १८ विद्यार्थी एक शिक्षक व ड्रायव्हरसह गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती. नाल्यावरुन भरपूर पाणी वाहत असल्यामुळे गावातील नागरिक, महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांनी मानवी साखळी निर्माण करुन या सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलविले. आता परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंम्बे यांनी दिली आहे. 

हवामानाचा व पावसाचा अंदाज घेवून काल संध्याकाळी एसडीआरएफची टीम देगलूर येथे पाठविण्यात आली होती. या टीमने सांगवी उमर, मेदनकल्लूर, शेळगाव, तमलूर या पूरपरिस्थीती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी २ हजार २५१ नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे कार्य या टीमने केले आहे. आज सीआरपीएफची टिम नायगावला बचाव कार्य करुन धर्माबादला गेली आहे. तसेच  एसडीआरएफची टिम कंधारला बचाव कार्यासाठी पाठविली आहे. तसेच मनपाचे शोध बचाव पथक नायगाव तालुका येथे पोहोचून दोन यशस्वी बचावकार्य केले आहेत. 

सध्या सर्व जिल्ह्यात काही मंडळात मोठया प्रमाणात पाऊस सुरु असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Nanded: School bus stuck in flood water, 18 students saved by forming a human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.