Nanded: माहूरात दुहेरी हत्याकांड; शेतात कापूस वेचणाऱ्या दोन सख्या जावांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:05 IST2025-11-21T19:04:13+5:302025-11-21T19:05:36+5:30
चोरट्यांनी अंगावरील दागिने लुटून, गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Nanded: माहूरात दुहेरी हत्याकांड; शेतात कापूस वेचणाऱ्या दोन सख्या जावांची निर्घृण हत्या
कुपटी (जि. नांदेड) : माहूर तालुक्यातील पाचुंदा परिसरात स्वत:च्या शेतात कापूस वेचणीचे काम करणाऱ्या दोन सख्या जावांचा अज्ञात व्यक्तीने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. सायंकाळी ५ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतकला अशोक आढागळे वय ५५, अनुसयाबाई साहेबराव आढागळे (वय ५०) या दोघी गुरुवारी दुपारी शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता शेतात दोघींचा मृतदेह आढळून आला. अज्ञात चोरट्यांनी अंगावरील दागिने लुटून, गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच माहूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास चोप्रे यांनी टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन माहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, शेतात कामाला जाणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास वाढवत आहेत.