डोळ्यासमोर मातीसह पीक वाहून गेले; हताश शेतकऱ्याचा पुरातच जीवन संपविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:27 IST2025-09-27T18:24:56+5:302025-09-27T18:27:50+5:30
कुटुंब कशावर जगणार?' अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचला

डोळ्यासमोर मातीसह पीक वाहून गेले; हताश शेतकऱ्याचा पुरातच जीवन संपविण्याचा प्रयत्न
- मारोती चिलपिपरे
कंधार (नांदेड): कंधार तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली अनेक पिके मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान, शनिवारी तालुक्यातील भोजूच्यावाडी येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वेळीच त्याला वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कंधार तालुक्यात जुलै महिन्यापासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच शुक्रवारी रात्री पासून सारखा पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येथे नाल्या, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या भागात, शनिवारी तालुक्यातील भोजूचीवाडी गावातून एक घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध शेतकऱ्याने डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त होताना पाहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्याची पुराकडे धाव
चुडाजी कागणे (५५) असे शेतकऱ्याचे नाव आहे. कागणे यांच्या शेतातील २६ रोजी शुक्रवारी रात्रीपासून चालू असलेल्या पावसामुळे मातीसह पिके वाहून गेली आहेत. या जमिनीवर त्यांचे संपूर्ण कुटुंब जगते. परंतु पाऊस आणि पुरामुळे त्यांचे शेत पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि उभे पीक नष्ट झाले. नुकसानीचे हे दृश्य पाहून त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते जवळून वाहणाऱ्या नदीच्या दिशेने धावले. नदीत उडी मारून आयुष्य संपवण्याचा त्यांचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने गावातील काही तरुणांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले.
शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती; पिकं उद्ध्वस्त झाल्याचे पाहून हताश, कंधारमध्ये ५५ वर्षीय शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न #nanded#MarathwadaRain#Farmerspic.twitter.com/k6OZSlhV1y
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 27, 2025
शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद
या घटनेमुळे मुसळधार पावसामुळे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती समोर आणली आहे. सततचा पाऊस आणि पुरामुळे पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. हीच परिस्थिती पूर्ण तालुक्यात निर्माण झाली आहे. जिथे शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे पाण्यात वाहून गेल्याचे पाहून हवालदिल झाले आहेत.