इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर अत्याचार अन् थेट व्हिडिओ व्हायरल! भोकरमध्ये नराधमावर पोक्सो गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:03 IST2026-04-01T18:02:37+5:302026-04-01T18:03:51+5:30
सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; भोकरमध्ये अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या आरोपीची रवानगी जेलमध्ये.

इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर अत्याचार अन् थेट व्हिडिओ व्हायरल! भोकरमध्ये नराधमावर पोक्सो गुन्हा
भोकर (जि. नांदेड): सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे आणि नंतर ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्या एका विकृताला भोकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख करून १७ वर्षीय मुलीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपी अविनाश राजेश मानपुरे (रा. रेणापूर) याला न्यायालयाने १ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विश्वास संपादन करून केला अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश मानपुरे याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित मुलीशी ओळख वाढवली. हळूहळू तिचा विश्वास संपादन करून त्याने तिच्याकडून काही फोटो आणि व्हिडिओ मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी जेव्हा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा संतापलेल्या आरोपीने २८ मार्च रोजी इन्स्टाग्राम आयडीवरून तिचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करून तिची बदनामी केली.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
या प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबाने भोकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आणि ३० मार्च रोजी त्याला अटक केली. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला बुधवारी (१ एप्रिल) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलीस निरीक्षक अजित कुंभार आणि पोलीस हवालदार गुरुदास आरेवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.