Nanded: धुऱ्याच्या वादात सख्ख्या भावाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:45 IST2025-10-11T19:44:41+5:302025-10-11T19:45:12+5:30
याप्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Nanded: धुऱ्याच्या वादात सख्ख्या भावाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
भोकर : उमरी तालुक्यातील बोळसा येथे शेतीलगतचा धुरा फोडण्याच्या क्षुल्लक वादातून सख्ख्या भावाने विळ्याने पोटात वार करून खून केला आणि पुतण्यास गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी आरोपी भावाला जिल्हा सत्र न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद सलीम यांनी ९ ऑक्टोबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
यासंदर्भातील माहिती अशी की, आरोपी माधव गंगाराम चिकटवाड (रा. बोळसा, ता. उमरी) याने १ ऑगस्ट २०२० रोजी शेतीलगतचा धुरा फोडल्याच्या कारणावरून भाऊ धाराजी चिकटवाड यांच्याशी वाद घातला. त्यानंतर विळ्याने भावाच्या पोटावर वार करून खून केला. यावेळी वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर दगडाने हल्ला करून दीपक चिकटवाड यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारच्या वतीने अभियोक्ता अनुराधा डावकरे, रेड्डी यांनी दहा साक्षीदारांचे परीक्षण केले. गंभीर जखमी फिर्यादी दीपक चिकटवाड यांची साक्ष तसेच वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात आरोपी माधव चिकटवाड याला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड, तसेच प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात फिरोजखान पठाण यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.