Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:18 IST2025-05-06T18:17:51+5:302025-05-06T18:18:35+5:30
अर्धापूरात वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा केळी बागांना मोठा फटका बसत असून पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून बाग जोपासत असतानाच सोमवारी दि.५ रोजी सायंकाळी जोरदार वादळी वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उन्मळून, मोडून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले.
काही दिवसापासून तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने वाढत्या तापमानात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या. पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून केळीच्या बागा शेतकऱ्यांनी जगवल्या. काढणी आलेली असतानाच आता वादळीवाऱ्याने केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. बामणी येथील बालाजी सत्ताप्पा हुडे गट नं.३०, उमाजी शंकर देलमडे ग. नं.७७, संजय नागोराव देलमोडे गट २७, माणिक मारोती हुडे गट नंबर २४, बंडू बाबुराव देलमडे गट नंबर २६ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. बामणी शिवारात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या असून अक्षरशः केळीच्या पानांची चाळणी झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने या शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्या आहेत. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.