प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:05 IST2026-04-01T13:03:15+5:302026-04-01T13:05:52+5:30
शिवकुटुंब मेळावा आटोपून गावी जाताना काळाचा घाला; ढवळे कॉर्नर परिसरात अपघात

प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत
नांदेड: ज्येष्ठ शिवव्याख्याते, पुरोगामी विचारवंत तथा प्रबोधनकार हभप मधुकर महाराज बारूळकर (वय ५४) यांचा मंगळवारी सायंकाळी नांदेड येथील ढवळे कॉर्नर परिसरात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदाय आणि बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराज हे बारूळ येथील विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहत होते.
शिवकुटुंब मेळावा ठरला शेवटचा कार्यक्रम
नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला 'शिवकुटुंब मेळावा' आटोपून मधुकर महाराज बारूळकर हे आपल्या दुचाकीने बारूळकडे निघाले होते. ढवळे कॉर्नर परिसरात पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या एम.एच. २६-सी.एच. ४३८६ या क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महाराजांचा जागीच अंत झाला. त्यांच्या जाण्याने समाज प्रबोधनाचे एक पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुशिक्षित आणि कर्तृत्ववान परिवार
हभप मधुकर महाराज बारूळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून समाजाच्या सेवेत रुजू केले होते. त्यांचा एक मुलगा पोलीस उपनिरीक्षक, दुसरा विक्रीकर निरीक्षक तर मुलगी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बारूळ (ता. कंधार) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रबोधन क्षेत्राची मोठी हानी
पुरोगामी विचारांचे कट्टर समर्थक आणि छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार करणारे महाराज त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जात. त्यांच्या अचानक जाण्याने नांदेड जिल्ह्यातील आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघातातील टिप्परवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शहरात अवजड वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.