Nanded: बडे दिलवाला शेतकरी! पूर पार करत चार दिवसांपासून उपाशी वानरांना दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:00 IST2025-09-30T19:59:47+5:302025-09-30T20:00:43+5:30
पूर ओसरला नाही, पण माणुसकी जागी! पुरात अडकलेल्या वानरांना शेतकऱ्यांनी पोहत जाऊन दिले जीवदान

Nanded: बडे दिलवाला शेतकरी! पूर पार करत चार दिवसांपासून उपाशी वानरांना दिले जीवदान
अर्धापूर (नांदेड): अर्धापूर तालुक्यातील असना नदीच्या पात्रात अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे पूरस्थिती कायम आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणी साचल्याने येथील शेतात पुरामुळे एका झाडावर अडकलेल्या वानरांची टोळी उपाशीपोटी तडफडत होती. हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन या वानरांना अन्न पुरवले आणि त्यांचे प्राण वाचवले.
चार दिवसांपासून पाण्यात अडकले होते वानर
असना नदी गोदावरीला मिळत असल्याने आणि गोदावरी नदी पाणी घेत नसल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील देवगाव शिवारात सखल भागात एक ते दोन परस (सुमारे ५ ते १० फूट) पाणी साचले आहे. याच परिसरातील एका उंच झाडावर वानरांची एक टोळी गेल्या चार दिवसांपासून अडकली होती. चार दिवसांपासून उपाशी असल्याने हे वानर तडफडत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले.
शेतकऱ्यांनी दाखवली तत्परता
परिसरातील शेतकरी उमाजी कपाटे, ओम जाधव, संतोष जाधव, विठ्ठल जाधव, माधव जाधव, सदाशिव तिडके, उनकेश्वर जाधव, गजानन तिडके, संभाजी जाधव यांनी तातडीने एकत्र येऊन मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी सुमारे दीड परसभर पाण्यातून मार्ग काढत त्या झाडापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांनी झाडावरील वानरांना केळी आणि इतर फळे दिली, ज्यामुळे त्यांना तात्काळ जीवदान मिळाले. इतकेच नाही तर काही वानरांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यातही त्यांनी मदत केली. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि माणुसकीमुळे उपाशी असलेल्या अनेक वानरांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या धाडसाचे आणि माणुसकीचे परिसरात कौतुक होत आहे.