नांदेड जिल्ह्यातून नुकसानीपोटी तुटपुंज्या निधीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:18 PM2019-11-12T16:18:06+5:302019-11-12T16:20:46+5:30

प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रूपये अपेक्षित निधी

min relief fund proposes for farmers in Nanded district | नांदेड जिल्ह्यातून नुकसानीपोटी तुटपुंज्या निधीचा प्रस्ताव

नांदेड जिल्ह्यातून नुकसानीपोटी तुटपुंज्या निधीचा प्रस्ताव

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमधून नाराजी

नांदेड : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे.  परंतु हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावात दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

आॅक्टोबर महिन्याच्या २० तारखेनंतर बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. त्यापाठोपाठ शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी  मुसळधार पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल केले. तर शेतातील अवजारांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून सदर कालावधीत सोयाबीन काढणीला आले होते तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून त्याची वळई लावली होती. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. परिणामी ढिगारे करुन ठेवलेल्या सोयाबिनच्या वळईचे नुकसान झाले तर ज्वारीच्या कणसाला अंकुर फुटले. सोयाबीन, कापूस या पिकांसह फुलांच्या शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मदतीने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. परंतु ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची आकडेवारी शासनदरबारी पाठविण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर,मूग आदी पिकांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत किती मिळेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यात जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र ६ लाख ३३ हजार २३१ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ७५ हजार ३७३ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे तर कापूस २ लाख ४ हजार १६५, मका- ४ हेक्टर, ज्वारी- ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर- १२ हजार ५००, मूग १२२३ हेक्टर तर ४ हजार ६ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.  
बागायत पिकाखाली भाजीपाला व इतर पिकांसाठी ८ लाख २३ हजार ५०० रुपये निधी अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक ५९ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १७७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये  मोसंबी- ७ हेक्टर, आंबा- ६ हेक्टर, चिकू ३ हेक्टर आदी फळबागांचा समावेश आहे. त्यासाठी ३१ लाख ८६ हजार निधी अपेक्षित असून हेक्टरी १८ हजार          रुपये प्रस्तावित केले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त बाधित क्षेत्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ६ लाख ३३ हजार ४६९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा अधिक जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत- ६ लाख ३३ हजार २३१ हेक्टर, बागायत- ६१ हेक्टर, फळपिके- १७७ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. या सर्व पिकांसाठी ४३० कोटी ९९ लाख ८० हजार ३०० रुपये अपेक्षित निधीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे़

धर्माबाद तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसान
धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ३७ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ २ हेक्टरवरील केळींचे नुकसान असून प्रती हेक्टरी १३ हजार ५०० निधी अपेक्षित असून एकूण ५ लाख २६ हजार ५०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर मुखेड तालुक्यात २२ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान असून येथील ३० शेतकऱ्यांना २ लाख ९७ हजार निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी फळ पिके सोडून जिरायत पिकाखालील क्षेत्रासाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार ८०० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमुद केले आहे. त्याचबरोबर बागायत पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रूपये मदत अपेक्षीत असून त्यासाठी ८ लाख २३ हजार ५०० रूपये तर फळ पिकाखालील बाधीत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रूपये मदत प्रस्तावित केली असून त्यासाठी ३१ लाख ८६ हजार रूपयांचा निधी अपेक्षित असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे़ 

८५ हजार शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान
४२ हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८५ हजार ८५० असून बाधित क्षेत्र १ लाख ८६ हजार ५४७ हेक्टर आहे. त्याचबरोबर २ हेक्टरपर्यंतचे ६ लाख ३२ हजार २४९ शेतकऱ्यांची ४ लाख ६१ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मुखेड तालुक्यात ६६ हजार ३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ हदगाव - ६४ हजार ५००, कंधार तालुक्यात ६४ हजार ३१५, लोहा तालुक्यात ६३ हजार ३५४ त्यापाठोपाठ देगलूर तालुक्यात ४४ हजार ९९०, नायगाव तालुक्यात ४६ हजार ६३३, हिमायतनगर तालुक्यात ३४ हजार ४०५, बिलोली तालुक्यात ३२ हजार ८२६, नांदेड तालुक्यात ३० हजार ६७९, अर्धापूर तालुक्यात २५ हजार २८६, मुदखेड तालुक्यात १६ हजार ९२५, धर्माबाद तालुक्यात २४ हजार २३५, किनवट तालुक्यात ४३ हजार २१५, माहूर तालुक्यात २१ हजार ४०९,  भोकर तालुक्यात ४१ हजार ५०७ तर उमरी तालुक्यात २७ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

Web Title: min relief fund proposes for farmers in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.