मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 09:09 PM2021-11-28T21:09:15+5:302021-11-28T21:13:07+5:30

मराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला.

Marathwada gets its rightful 64 TMC water; Nanded's 40 new irrigation projects will also be completed | मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

googlenewsNext

नांदेड -  राज्याच्या हक्काचे तेलंगणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी राज्याच्या व मराठवाड्याच्या हितासाठी पैनगंगेमध्ये उपलब्ध करुन द्यावे, या अनुषंगाने जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavhan) यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.  जलसंपदा विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार १९.२९ टीएमसी पाणी मध्य गोदावरीमध्ये तर ४४.५४ टीएमसी पाणी पैनगंगेमध्ये असे एकूण ६४ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध होणार आहे( Marathwada gets 64 TMC water ) . त्यातूनच नांदेड जिल्ह्यातील ४० नवीन प्रकल्प व पैनगंगेवरील सात उच्च पातळी बंधारे मार्गी लागणार आहेत.

मराठवाड्याला हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे. यासाठी मागील सात वर्षपासून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या संदर्भात २६ जून २०२१ रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रश्नाबाबत, भविष्यात हाती घ्यावयाच्या सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यातूनच राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्याला ६४ टीएमसी हक्काचे पाणी उपलब्ध होत आहे.  

४० योजनांसाठी १३५.८० दलघमी पाणी
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने स्थानिक स्तरीय २६ योजना व राज्यस्तरीय १४ योजना अशा एकूण ४० योजनांसाठी १३५.८० दलघमी पाणी वापर प्रस्तावित केलेला आहे. या पाणी उपलब्धतेमुळे नांदेड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भोकर, लोहा, कंधार, मुदखेड, अर्धापूर, नांदेड, देगलूर या तालक्यामध्ये स्थानिक स्तरीय २६ प्रकल्प  हाती घेतले जाणार आहेत. या प्रकल्पांना या पाण्यातून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रस्तावित केलेल्या राज्यस्तरीय १४ योजनांमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, देगलूर, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश आहे.

नांदेडसह हिंगोली, यवतमाळलाही फायदा
पैनगंगा नदीमध्ये उपलब्ध झालेल्या ४४.५४ टीएमसी पाण्यामधून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या खाली निम्न पैनगंगा प्रकल्पापर्यंत ७ नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांसोबतच उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची तूट देखील भरुन निघेल. त्याचा फायदा हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याला होईल. नवीन सात उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिलेले आहेत. यामध्ये हदगाव तालुक्यातील पांगरी साप्दी (९.८० दलघमी), गोजेगाव (१३ दलघमी), बनचिंचोली (९.८० दलघमी), धारापूर ता. हिमायतनगर (९ दलघमी) तर किनवट तालुक्यातील मारेगाव (९.६९ दलघमी), किनवट (१०.५७ दलघमी) आणि माहूर तालुक्यातील धानोडा (१० दलघमी) या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा यशस्वी
मराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या मागणीला गती मिळाली. त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून आज प्रत्यक्षात मराठवाड्याच्या हक्काचे ६४ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे.

Web Title: Marathwada gets its rightful 64 TMC water; Nanded's 40 new irrigation projects will also be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.