ऊस वजनातील ‘काटा’ निघणार! साखर कारखान्यांच्या मनमानीला चाप बसणार, नवी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:40 IST2026-03-12T18:38:57+5:302026-03-12T18:40:02+5:30
ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! वजनकाटे सर्व्हरला जोडले जाणार; छेडछाड झाल्यास थेट सिस्टिममध्ये होणार उघड

ऊस वजनातील ‘काटा’ निघणार! साखर कारखान्यांच्या मनमानीला चाप बसणार, नवी नियमावली
नांदेड : राज्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांबाबत ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. वजनातील फसवणूक रोखण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘वैधमापनशास्त्र विभागा’च्या चार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला १२ मार्चपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कारखानदारांच्या मनमानीला चाप बसण्याची शक्यता आहे.
दरवर्षी गळीत हंगाम सुरू झाला की, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे वजनकाट्यांबाबत तक्रारींचा ओघ सुरू होतो. आश्चर्याची बाब म्हणजे वैधमापनशास्त्र विभागाकडून दरवर्षी सर्व कारखान्यांचे काटे ‘दोषमुक्त’ असल्याचा अहवाल दिला जातो. मग जर काटे बरोबर असतील तर शेतकऱ्यांच्या तक्रारी येतातच का? याच विसंगतीचा अभ्यास आता ही नवनियुक्त समिती करणार आहे. चौकशी समितीमध्ये अध्यक्ष सु. ह. चाटे (सह नियंत्रक, संभाजीनगर विभाग), उपाध्यक्ष डी. पी. पवार (उप नियंत्रक, सांगली), सदस्य सचिव डी. के. शेजवल (निरीक्षक, वाघोली), सदस्य आर. पी. टाळकुटे (निरीक्षक, बारामती) आदींचा समावेश आहे.
‘ऑनलाइन’ ट्रॅकिंग आणि नवीन तंत्रज्ञान
यावेळेस केवळ कागदोपत्री तपासणी न करता, तांत्रिक निकषांवर भर दिला जाणार आहे. राज्यातील सर्व वजनकाटे सर्व्हरला ऑनलाइन जोडले जाण्याची शक्यता आहे. यामुळे काट्यामध्ये छेडछाड झाल्यास ती थेट सिस्टिममध्ये पकडली जाईल. सध्याच्या ‘एसओपी' (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोड्युसर)मध्ये बदल करून अधिक सक्षम प्रणाली राबवण्याचा मानस समितीने व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांनी या बाबी लक्षात घ्याव्यात
कारखान्याच्या काट्यावर वैधमापनशास्त्र विभागाचे चालू वर्षाचे ‘सीलिंग’ आणि प्रमाणपत्र आहे का, याची खात्री करावी, ट्रॅक्टर किंवा ट्रक काट्यावर चढवण्यापूर्वी वजन ‘०.००’ असल्याची खात्री करावी, वजन झाल्यानंतर त्वरित संगणकीय पावती घ्यावी, तसेच त्यावर वेळ, दिनांक आणि गाडीचा नंबर तपासावा, जर तुम्हाला वजनात मोठी तफावत वाटत असेल तर साखर आयुक्त कार्यालय किंवा स्थानिक वैधमापनशास्त्र विभागाकडे तक्रार नोंदवावी.
सर्वच कारखान्यांवर वॉच राहणार
आम्ही सद्य:स्थितीत कार्यप्रणालीत आवश्यक सुधारणा सुचवणार आहोत. तांत्रिक बदलांमुळे वजनातील दोष त्वरित समोर येतील. या समितीचा राज्यातील सर्वच कारखान्यांवर वॉच राहणार आहे.
सु. ह. चाटे, अध्यक्ष, चौकशी समिती