नांदेडमध्ये काँग्रेसचा हात सोडून ४० माजी नगरसेवक भाजपच्या छायेत; पण मतदार बदलेल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:52 IST2025-12-19T17:52:09+5:302025-12-19T17:52:36+5:30
खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह महापालिका निवडणूक प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे यांना ‘जुने-नवे’ असे संतुलन साधत रणनीती आखावी लागणार आहे.

नांदेडमध्ये काँग्रेसचा हात सोडून ४० माजी नगरसेवक भाजपच्या छायेत; पण मतदार बदलेल का?
नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने राजकीय इतिहास घडवला होता. ८१ पैकी ७३ जागा जिंकत काँग्रेसने महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले होते. त्या विजयामागे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व केंद्रस्थानी होते. मात्र, आज त्याच अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप नांदेड महापालिकेवर सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. सत्ता आणि पक्ष बदलले असले, तरी मतदारांचा विश्वासही बदलणार का, हाच खरा प्रश्न आहे. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २०१७ मध्ये काँग्रेसकडून निवडून आलेल्या ७३ पैकी तब्बल ४० नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी महापौर, उपमहापौर, माजी सभापती यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केलेले अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपकडे सध्या संख्याबळ आणि अनुभव असला, तरी हे सगळे समीकरण प्रत्यक्ष मतपेटीत कितपत उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण यांनी मुस्लिम, दलित आणि वंचित समाजाला सोबत घेऊन स्थानिक राजकारणाची मजबूत बांधणी केली होती. विविध समाजघटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा त्यांचा दृष्टिकोन राहिला आहे. मात्र, त्यांच्या पक्षांतरानंतर मुस्लिम आणि दलित समाजातील बहुतांश नगरसेवकांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. तर काहींनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले तर काही जण एमआयएमच्या वाटेवर आहेत.
महापालिका निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात उभे राहायचे झाल्यास भाजपची उमेदवारी स्वीकारणे अपरिहार्य आहे. मात्र, पक्षांतरित नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळते का? आणि मिळाल्यास मतदार त्यांना पूर्वीप्रमाणे स्वीकारतात का? हा राजकीय पेच आहे. स्थानिक निवडणुकांत उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क, केलेली विकासकामे आणि स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरतात, तरीही पक्षनिष्ठा आणि विश्वासघाताचा मुद्दा अनेक मतदारांच्या मनात असतो.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची जबाबदारी विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व कितपत स्वीकारले जाते, हेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. अल्पसंख्याक आणि दलित समाजातील मतदार अजूनही काँग्रेससोबत असल्याने भाजपसमोरची लढत सोपी नाही.
भाजप नेत्यांना बसवावा लागेल ‘जुने–नव्यांचा’ मेळ
आजघडीला भाजपमध्ये दाखल झालेले सगळेच इच्छुकांच्या रिंगणात आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांच्याशी दोन हात केलेले आजही भाजपमध्येच असून त्यांचीही दावेदारी आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत अशोकराव चव्हाण यांच्यासह महापालिका निवडणूक प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे यांना ‘जुने-नवे’ असे संतुलन साधत रणनीती आखावी लागणार आहे. पक्षांतरित नगरसेवकांचा अनुभव, भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्या समीकरणांचा मेळ घालण्यात यश मिळाल्यासच महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणे शक्य होईल.