शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; नांदेड-हिंगोली जिल्ह्यात यंदाची दिवाळी 'काळी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:02 IST2025-10-20T19:01:18+5:302025-10-20T19:02:17+5:30
शासनाने ७ मार्च २०२४ रोजी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती, परंतु तेव्हापासूनच बाराही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला प्रखर विरोध होत आहे.

शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; नांदेड-हिंगोली जिल्ह्यात यंदाची दिवाळी 'काळी'
मालेगांव ( जि.नांदेड) : शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कथित अन्यायकारक धोरणाचा निषेध म्हणून यंदाची दिवाळी 'काळी दिवाळी' म्हणून साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काल (दि. १९ ऑक्टोबर) अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामार्गाला प्रखर विरोध
शासनाने ७ मार्च २०२४ रोजी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती, परंतु तेव्हापासूनच बाराही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला प्रखर विरोध होत आहे. शेतकऱ्यांची मागणी नसलेला हा महामार्ग बहुतांश बागायती पट्ट्यातून जात असल्याने, तुरळक ठिकाणे वगळता इतरत्र जमीन संपादनाच्या कामाला शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बाधित शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीचा कार्यक्रम सर्वत्र उधळून लावत महामार्ग विरोधात तीव्र उद्रेक व्यक्त केला. यामुळे शासनाला या महामार्गाच्या अधिसूचनेचा कालावधी २८ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवावा लागला आहे.
दिवाळी साजरी करण्याचा त्राण नाही
अतिवृष्टीचा मोठा फटका, सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन, सोयाबीनच्या दरातील लक्षणीय घट आणि शासनाकडून जाहीर केलेली मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये दिवाळी सण साजरा करण्याचा त्राण उरलेला नाही. अशातच, शक्तिपीठ महामार्ग मोजणीची टांगती तलवार शेतकऱ्यांची झोप उडविणारी ठरली आहे. त्यामुळे आनंद हिरावून घेणारी ही दिवाळी 'काळी दिवाळी' म्हणून साजरी करण्याचा निर्धार शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीस नागोराव इंगोले मालेगावकर, प्रमोद इंगोले, सुभाष मोरलवार, गजानन तीमेवार, सतीश कुलकर्णी, मारुती सोमवारे, जळबा बुट्टे, गोविंद कामेवार, अंबादास इंगोले, प्रदीप पाटील, शंकर तीमेवार, दशरथ स्वामी, कचरू मुधळ (उमरी), प्रदीप अडकिने (डोंगरकडा), दिलीप कराळे, धोंडबाराव कल्याणकर (गिरगाव), अनिल चव्हाण, ज्ञानोबा हाके (भाटेगाव), सुभाष इंगळे (हदगाव) यांच्यासह मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.