हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:58 IST2025-06-03T13:57:15+5:302025-06-03T13:58:18+5:30

कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक; स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव

Hing Bagha, look how much damage has been done to the fields? The viral video of the little girl has shaken the administration | हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले

हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले

नायगाव (जि. नांदेड) : निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांच्या जगण्यावरच घाला येतो, हे आपण अनेकदा पाहतो. अशाच एका संकटात सापडलेल्या नायगाव मतदारसंघातील शेतकरी कुटुंबाच्या वेदना एका चिमुकलीच्या निष्पाप शब्दांमधून व्यक्त झाल्या. कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहाेचली. तद्नंतर स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव घेत पाहणी केली.

पावसाच्या सतत माऱ्यामुळे अनेक गावांतील शेतात पिकांचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकट तर आहेच, पण त्याहूनही मोठं आहे ते मानसिक ओझं. अशाच परिस्थितीत एका केवळ सहा-सात वर्षांच्या मुलीचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साध्या, सरळ शब्दांत तिने तिच्या घरच्या शेतीतील हाल अपेष्टांची हकिकत मांडली. तिच्या डोळ्यांतील आशा, आवाजातील आत्मविश्वास आणि बोलण्यातली स्पष्टता, हाच तो क्षण होता ज्याने हजारो हृदयं पिळवटून टाकली. सदर व्हिडिओ पाहताच आमदार राजेश पवार हे तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी यांना घेऊन त्या चिमुकलीच्या शेतावर पोहोचले. त्यांनी स्वतः शेतात जाऊन झालेले नुकसान पाहिले आणि शेतकरी कुटुंबाशी मनमोकळा संवाद साधला. पिकांची पाहणी झाल्यानंतर तत्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

चिमुकलीचा भावनिक व्हिडिओ
''हिंग बघा, किती नुकसान झालंय? आम्ही वावरात शेंगा पेरल्या होत्या. कोणीच सायब आलं नाही बघायला. एवढ नुकसान झालंय. मोड फुटलेत. नुकसान भरपाई नाय भेटली अजून.'' अशा शब्दात चिमुकलीने प्रत्येक शेतकऱ्याचे दु:ख मांडले. हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन हलले अन् आमदारांसह अधिकारी बांधावर पोहचले. 

चिमुकलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला
आमदार पवार अन् सदर चिमुकलीची बांधावर भेट झाली. यावेळी त्यांनी तिला कडेवर घेत चॉकलेट दिले अन् तिच्याशी गप्पा मारल्या. तुला काय व्हायचं? विचारल्यानंतर तिने लाजतच मला डाॅक्टर व्हायचं, असं उत्तर दिलं. हे ऐकून आमदारही क्षणभर भावुक झाले. जेव्हा तू डॉक्टर होशील, तेव्हा मी तुझ्या घरी परत येईन पेढे खायला, असं म्हणत त्यांनी तिला आशीर्वाद दिले. तसेच मुलगी हुशार आहे, तिला शिकू द्या. कुठलीही अडचण आली, तर मला त्वरित कळवा. तिच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन आमदार पवार यांनी तिच्या पालकांना दिले.

Web Title: Hing Bagha, look how much damage has been done to the fields? The viral video of the little girl has shaken the administration