भोकर (नांदेड) : पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली कारावासाची शिक्षा भोगताना, हायकोर्टातून निर्दोष सुटका झालेल्या पतीने, कोर्टात साक्ष दिल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटकेतील आरोपी पतीस येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंगळवारी (दि. २९) सुनावली आहे.
मारोती माधव टिकेकर (रा. सावरगावमाळ, ता. भोकर) असे आरोपीचे नाव असून, सुरेखा मारोती टिकेकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपीने २०१९ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन ४८ दिवसांत तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पूनम सूर्यवंशी यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. माणुसकीला व नात्याला काळिमा असलेली घटना अशी टिप्पणी नोंदवून तत्कालीन जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगताना सदरील आरोपीने हायकोर्टात अपील केले होते. त्यामुळे हायकोर्टाने सदरील गुन्ह्यातून फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
त्यानंतर कोर्टात पत्नीने दिलेल्या साक्षीमुळेच जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा राग मनात धरून पत्नी सुरेखासोबत राहात होता. दरम्यान, ७ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत पतीने भोकर बायपासवरील जंगलात पत्नीचा खून करून पसार झाला होता. सदरील मयत महिलेची अर्धवट खोपडी, हाडांचे अवशेष व वस्त्रे २६ रोजी पोलिसांना आढळून आले होते. त्यावरून भोकर व नांदेड पोलिसांनी तपास सुरू केला होता. तत्पूर्वी मयत महिलेच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. यावरून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नांदेड येथे मिळून आला. अटकेतील आरोपीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे. पो.नि. अजित कुंभार पुढील तपास करीत असून, डीएसबीचे अमोल आरेवार सहकार्य करीत आहेत.