नांदेडमध्ये हेडकॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू; जिल्हा पोलीस दलातील नववा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 16:19 IST2021-05-25T16:18:07+5:302021-05-25T16:19:03+5:30
हेडकॉन्स्टेबल गंगाधरराव गजभारे यांची ११ मेला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

नांदेडमध्ये हेडकॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू; जिल्हा पोलीस दलातील नववा बळी
नांदेड: कंधार तालुक्यातील उस्माननगर ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल गंगाधर संभाजीराव गजभारे ( ५४ ) यांच्या कोरोनावरील उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. हेडकॉन्स्टेबल गंगाधरराव गजभारे हे नांदेड जिल्हा पोलीस दलातील कोरोनाचे नववे बळी ठरले आहेत.
हेडकॉन्स्टेबल गंगाधरराव गजभारे यांची ११ मेला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. प्रथम त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच त्यांचा आज सकाळी उपचारदरम्यान मृत्यू झाला. सिडको भागातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, तीन बहिणी व मेहुणे असा परिवार आहे. गंगाधर गजभारे यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दल आणि नवीन नांदेड व उस्माननगर परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. औरंगाबाद येथील राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई प्रविण गजभारे आणि प्रशांत गजभारे यांचे ते वडील होत.