Nanded: अपघातानंतर जळत्या कारमधून चालक बाहेर पडला; पण होरपळून करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:27 IST2025-12-26T15:24:23+5:302025-12-26T15:27:03+5:30
नांदेडमध्ये भरधाव कार बनली 'आगीचा गोळा'; मदतीसाठी धावण्यापूर्वीच चालकाचा होरपळून मृत्यू

Nanded: अपघातानंतर जळत्या कारमधून चालक बाहेर पडला; पण होरपळून करुण अंत
मारतळा (नांदेड): नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री मृत्यूने अत्यंत क्रूर खेळ मांडला. सोनखेड परिसरात एका भरधाव कारचा भीषण अपघात होऊन कारला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, कारला आग लागल्यानंतर चालक स्वतःला वाचवण्यासाठी आगीच्या ज्वाळांनिशी कारमधून बाहेर पडला, मदतीसाठी ओरडला, पण आगीचा रौद्ररूप पाहून कोणाचेही मदतीला जाण्याचे धाडस झाले नाही.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास लोहा येथून नांदेडच्या दिशेने जाणारी कार (क्र. एमएच २६ एके ६४४४) सोनखेड शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. कार वेगात असल्याने ती थेट दुभाजकावर आदळली आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला. बघता बघता कार आगीचा गोळा बनली.
तो आक्रोश आणि हतबल लोक
अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की, कारने पेट घेतलेला असताना चालक आगीत होरपळतच बाहेर आला. त्याने उपस्थितांना वाचवण्यासाठी हात जोडून विनवणी केली, आरडाओरडा केला. मात्र, आगीच्या ज्वाळा इतक्या लांबवर पसरल्या होत्या की भीतीपोटी कोणीही जवळ जाऊ शकले नाही. काही वेळातच चालकाचा मृतदेह आगीत पूर्णपणे होरपळला आणि त्याने जागीच प्राण सोडले. आग शांत झाल्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मृताची ओळख अद्याप अस्पष्ट
सदर कार नांदेडच्या नाथनगर परिसरातील असल्याचे समजते, मात्र मयत व्यक्तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती. या भीषण अपघातामुळे महामार्गावर ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.