Haldi record production in Ardhapur taluka | अर्धापूर तालुक्यात हळदीचे विक्रमी उत्पादन
अर्धापूर तालुक्यात हळदीचे विक्रमी उत्पादन

पार्डी : अर्धापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने शेतीतील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़ त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळला आहे़
तालुक्यात प्रामुख्याने केळी पिकाला पसंती दिली जात असे़ परंतु, मागील काही वर्षांपासून पाण्याची कमतरता व अस्मानी संकट केळीच्या मुळावर आले असल्याने केळी पिकाला बगल देऊन शेतकरी हळदीकडे वळला होता़ त्यामुळे गत वर्षात हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती़ वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली होती़
गतवर्षात मे महिन्यात हळदीची लागवड केली होती़ ती या वर्षात फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीस सुरुवात झाली आहे़ गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षात हळदीच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे़ गेल्या वर्षात एकरी २० ते २५ क्विंटल हळदीचे उत्पादन झाले होते व या वर्षात एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत़
हळदीमध्ये ५ ते ७ जातींचे हळदीचे बेणे आहे़ त्यात प्रामुख्याने कडप्पा, कृष्णा, राजापुरी, तामिळनाडू, शेलम व शेलम. अर्धापूर तालुक्यात व परिसरात प्रामुख्याने शेलम जातीच्या बेण्याची लागवड करतात़ परंतु पार्डी येथील शेतकरी गजानन देशमुख यांनी गेल्या दोन वर्षांपासून चिनी, शेलम जातीच्या बेण्याची लागवड करीत आहेत़ गेल्या वर्षात त्यांना एकरी ३२ क्विंटल हळद झाली होती़ गतवर्षात त्यांनी ७ एकर जमिनीत चिनी, शेलम हळदीची लागवड केली होती़ त्यावर्षी त्यांना भरपूर उत्पन्न झाले होते़ म्हणून, त्यांनी या वर्षात सुद्धा चिनी, शेलम जातीच्या बेण्याची लागवड करून भरपूर उत्पादन काढले आहे.
हळद लागवडीपूर्वी शेतीत प्रक्रिया
सर्वप्रथम नांगरलेल्या रानात एकरी चार ट्रॅक्टर शेणखत व प्रतिएकर जमिनीत तीन सुपर दाणेदार व एक पोटॅश मिसळून शेतात शिंपडून जमिनीला रूटर करून ४ फुटांच्या अंतराने बेड मारून त्या बेडवर उपडा वखर टाकून दीड ते पावणेदोन फूट रुंद होईल इतके दाबून बेड तयार केले़ ठिबकद्वारे बेड भिजविण्यात आले व नंतर कोळप्याच्या साह्याने बेडवर चार ते सहा इंच खोल इतक्या रेघोट्या मारण्यात आल्या़ एक बेडवर दोन रेघोट्या मारल्या, दोन रेघोट्याचे अंतर १० ते १२ इंच ठेवण्यात आले़
चिनी, शेलम जातीच्या बेण्याची प्रक्रिया
चिनी, शेलम जातीच्या बेण्याची लागवड करण्याअगोदर बेणे प्रक्रिया करण्यात आली़ १०० लिटर पाण्यामध्ये ५०० ग्रॅम मिकनेल्फ २०० ग्रॅम बुरशीनाशक २०० गॅ्रम क्लोरोपासरी फॉस मिसळून बेणे बुडवून घेतले़ बेण्याची लागवड केल्यानंतर चार-चार दिवसांच्या अंतराने पाणी देण्यात आले़ हळद लागवड केल्यावर जर पाऊस पडला तर विहीर किंवा बोअरचे पाणी देण्याची गरज राहत नाही़.

जमिनीतील पोत व वातावरणातील बदल किंवा खत व्यवस्थापनानुसार उत्पादनात वाढ किंवा घट होऊ शकते - गजानन देशमुख, शेतकरी, पार्डी ता. अर्धापूर, जि.नांदेड़


Web Title: Haldi record production in Ardhapur taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.