प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:18 IST2025-02-16T17:18:23+5:302025-02-16T17:18:32+5:30
मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी
नांदेड- प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडे निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. या घटनेत चार भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १९ जण जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मयतांमध्ये नांदेड येथील तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे.
नांदेड येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने २३ जण रवाना झाले होते. महाकुंभ मेळ्यात स्नान करून हे सर्व भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने अयोध्येकडे निघाले होते. दरम्यान, रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्सवर भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर जावून धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.
यामध्ये नांदेडमधील छत्रपती चौक परिसरात राहणाऱ्या सुनील दिगंबर वरपडे (वय ५०), अनुसया दिगंबर वरपडे (वय ८०), दीपक गणेश गोदले (वय ४०) आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण (वय ५०) यांचा समावेश आहे. तर जखमी १९ जणांना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.