अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:55 IST2024-09-13T19:54:30+5:302024-09-13T19:55:41+5:30
शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना जाहीर समर्थन देणारे त्यांचे ‘दाजी’ तथा माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी मेहुण्याची साथ सोडली आहे. त्यांनी कार्यकर्ता बैठकीत लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची घोषणा केली.
गुरुवारी शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीत ‘खतगावकर दादां’नी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या बहिणीचे पती माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु काही दिवसांतच अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले. तद्नंतर खतगावकर यांनीदेखील अशोकराव चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणे पसंत केले.
परंतु लोकसभा निवडणुकीत खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देऊन खतगावकर यांना विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले. पण तिथेही डावलण्यात आले. २०१९ मध्येही उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज होते. दरम्यान, गुरुवारच्या बैठकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची आणि डॉ. मीनल खतगावकर यांना नायगावमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाईल, अशी घोषणा केली.
भाजपकडूनही ऑफर
दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर डॉ. मीनल खतगावकर यांना उमेदवारी देण्याची ऑफर भाजपने दिली. पण ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे ऑफर नाकारली. नांदेड लोकसभेवर चव्हाण कुटुंबीयांचाच अधिकार असून, पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना माझा पाठिंबा राहील, असे खतगावकर यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये धुसफूस
खतगावकर हे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता थेट हायकमांडकडून प्रवेश घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खतगावकर यांच्या प्रवेशाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष हनमंत बेटमोगरेकर म्हणाले, खतगावकर हे काँग्रेसमध्ये पक्ष वाढविण्यासाठी येत असतील तर त्यांचे निश्चितच स्वागत करू.