मुखेड येथे ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:23 IST2018-04-20T19:23:31+5:302018-04-20T19:23:31+5:30
खरब खंडगांव जवळ आज दुपारी ३ च्या सुमारास ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले.

मुखेड येथे ट्रकच्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार
मुखेड (नांदेड ) : शहरापासुन जवळच असलेल्या खरब खंडगांव जवळ आज दुपारी ३ च्या सुमारास ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पिता-पुत्र जागीच ठार झाले. याप्रकरणी सतर्क नागरिकांमुळे ट्रक चालकास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कंधार तालुक्यातील गांधीनगर येथील रहिवाशी असलेले कंठीराम सोमसिंग जाधव (६० ) हे मुलगा विजय (३२ ) सोबत दुचाकीवर ((एमएच २६ एएच ७९९५ ) मित्राच्या नातवाच्या लग्नासाठी कोलंबी येथे गेले होते. विवाह सोहळा आटपून ते मुखेडहुन कंधारला जाण्यासाठी निघाले. दरम्यान खरब खंडगांव येथे तेलंगणाकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने (ए.पी. १६ टि. एक्स. ४८८७ ) त्यांना समोरून जोरदार धडक दिली. यामुळे दोघेही रस्त्यापासून २० फूट खाली फेकली गेली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर ट्रक चालकाने तेथून पळ काढला असता शंकर श्रीरामे, नारायण गायकवाड, प्रितमकुमार गवाले यांनी ट्रकचा पाठलाग करून चालकाला पकडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय चौबे, पोलिस उपनिरीक्षक कविता जाधव, पोहेका अनिल मोरे, देविदास गित्ते, बालाजी गारोळे, माधव महिंद्रकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. तुषार राठोड व बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष देविदास राठोड यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयास भेट देत जाधव कुटूंबीयांचे सात्वन केले. या घटनेमुळे संपूर्ण गांधीनगरमध्ये शोककळा पसरली आहे. विजय या नुकताच वनरक्षकाच्या परीक्षेत उतीर्ण झाला होता. घरातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.