धक्कादायक ! वाळू माफियाकडून शेतकऱ्याची कोयत्याने गळा चिरून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:55 IST2020-02-17T16:13:59+5:302020-02-17T16:55:20+5:30
शेतकऱ्याने पिकांना पाणी दिल्याने शेतातील चिखलमय रस्त्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा होत असल्याने ही हत्या झाल्याची माहिती आहे.

धक्कादायक ! वाळू माफियाकडून शेतकऱ्याची कोयत्याने गळा चिरून हत्या
हदगाव: तालुक्यातील ऊंचाडा गावातील कयादु नदीच्या पात्रानजीक शेती असलेल्या एका शेतकऱ्याची वाळू माफियाने कोयत्याने गळा चिरून निर्घुण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजे दरम्यान घडली. शिवाजी धोंडबाराव कदम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कदम यांनी पिकांना पाणी दिल्याने शेतातील चिखलमय रस्त्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा होत असल्याने ही हत्या झाल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी धोंडबाराव कदम (ऊमरकर) यांचे कयादु नदीकाठी तीन एकर शेती आहे. यामध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. नदीला पाणी असल्याने शेतात पाणीपाळी देणे सुरू आहे. मात्र या शेतातून मोठ्याप्रमाणावर अवैध वाहतूक करण्यात येते. पाणी दिल्याने शेत चिखलमय झाल्याने येथून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याच्या रागातून आज सकाळी ८:०० वाजता त्र्यंबक प्रभाकर चव्हाण (२८) याने शेतात पाणी का सोडतो असा विचारत कदम यांच्या मानेवर वार केला. कोयत्याचा मार लागताच शिवाजी किंचाळला त्यांचे वडील शेतातच होते. त्यांनी शिवाजीकडे धाव घेताच आरोपी फरार झाला. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने शिवाजी याचा तत्काळ मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपी त्र्यंबक चव्हाण यास एका वाळु ट्रक्टरमागे २००रु मिळत असून या भागातील वाळू माफियांना पोलीस व महसुल विभागाचे पाठबळ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी बीट जमादार शाम वडजे यांना निलंबित करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.