श्रद्धेपोटी गुरू केलेल्या भोंदूबाबानेच लग्नाचं आमिष दाखवून विधवा महिलेवर केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:59 IST2026-03-22T14:59:10+5:302026-03-22T14:59:35+5:30
एका नामांकित मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

श्रद्धेपोटी गुरू केलेल्या भोंदूबाबानेच लग्नाचं आमिष दाखवून विधवा महिलेवर केला अत्याचार
नांदेड- शहरातील एका नामांकित मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै २०२५ पासून सुरू होता. नंतर मात्र संन्यासी असल्याचं सांगून लग्नाला नकार देत पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाकण्याची धमकीही दिली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पीडित महिलेचं (४७ वर्ष) १२ वी पर्यंत शिक्षण झालं असून पतीचं निधन झाल्याने त्या तरोडा खु.भागात एका अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहतात. आयुष्याच्या उतारवयात अध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. परिसरातील इतर महिलांसोबत त्या १२ मे २०२५ रोजी पौर्णिमेनिमित्त गाडीपूरा येथील प्रसिद्ध मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी महिलेची आरोपी संत हरीगिर दत्तगिर गिरी महाराज (३८ वर्ष) याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने जून महिन्यात संत हरिगिर दत्तगिर महाराजला गुरू केलं.
दर गुरुवारी त्या मठामध्ये गुरूच्या दर्शनासाठी जात होत्या. सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्या मठामध्येच महापुजेसाठी थांबत होत्या. त्यावेळी हरिगिर महाराज हा पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही बाब पीडितेच्या लक्षात आली नाही. नंतर त्याने बाईल नंबर घेवून आपला नंबर दिला. त्यावरुन रात्री उशिरापर्यंत हरिगिर महाराज हा पीडितेशी बोलत होता.
१४ जुलै रोजी महिलेचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी हरिगिर याने घरी येण्याचा आग्रह धरला. अखेर १६ जुलै रोजी ते महिलेच्या घरी आला. तिने हरिगिर याची पाद्यपूजा करीत आर्शिवादही घेतले. बराच वेळ बसल्यानंतर त्यांनी महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली. परंतु तिने विरोध केला. यावेळी जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही दोन वेळेस या भोंदूबाबाने अत्याचार केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी भाूेंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
संन्यासी असल्याने लग्नास नकार
हरिगिर महाराज याने पीडिता ही विधवा असल्याची संधी साधून अत्याचार केल्यानंतर लग्नाचं आमिष दाखविलं होतं. परंतु नंतर मात्र संन्यासी असल्याने लग्न करता येत नाही असं म्हणत नकार दिला. तसेच वेळोवेळी पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक अशी धमकीही हरिगिरकडून देण्यात येत होती.