नांदेड जिल्ह्यात ३५ धाब्यांवर उत्पादन शुल्कच्या धाडी, १३७ मद्यपींवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:15 IST2025-05-05T16:09:09+5:302025-05-05T16:15:01+5:30
विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास ५ वर्षांपर्यंत कारावास व ५० हजारांपर्यंतचा दंड

नांदेड जिल्ह्यात ३५ धाब्यांवर उत्पादन शुल्कच्या धाडी, १३७ मद्यपींवर कारवाई
नांदेड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अनेकजण बेकायदेशीररीत्या विनापरवाना दारूविक्री करीत आहेत. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने २३ एप्रिल ते ३ मेदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी ३५ धाब्यांवर धाडी टाकीत तब्बल ११६ मद्यपींवर कारवाई केली.
जिल्ह्यातील धाबे, हॉटेल्स, पानटपऱ्या आदी ठिकाणी मद्यपी बेकायदेशीररीत्या मद्यप्राशन करताना आढळून येत होते. याबाबत तक्रारी वाढत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी, भरारी पथकाचे निरीक्षक तसेच दुय्यम निरीक्षक यांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २३ एप्रिल ते ३ मेदरम्यान अवैध दारूविक्री करणाऱ्या धाब्यांवर धाडी टाकत मद्यपींसह धाबाचालकांवर कारवाई केली.
यामध्ये शहर परिसरातील शेतकरी पुतळा परिसर, अशोकनगर, वर्कशॉप कॉर्नर, लातूर फाटा, जुना मोंढा, शिवाजीनगर या भागांचा समावेश आहे. या कारवाईमुळे विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अवैध दारूविक्रीला काहीसा आळा बसणार आहे. यापुढे हॉटेल, धाबाचालकांनी विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास ५ वर्षांपर्यंत कारावास व ५० हजारांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा दिला आहे.