उमरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 15:33 IST2018-12-15T15:31:03+5:302018-12-15T15:33:46+5:30
नगरपरिषदेची अनेक कामे ही अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला जात नाही.

उमरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने
उमरी (नांदेड ) : येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळी नगर परिषद कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन केले.
नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास अनंतवार , उपाध्यक्ष गणेश मदने , दिलीप पोलशेटवार , चंद्रकांत श्रीकांबळे, पंडित जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यानंतर कर्मचारी संघटनेच्या वतीने २९ ते ३१ डिसेंबर पर्यंत काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे . तर एक जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही, शासनही याची कसलीच जबाबदारी घेत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना आर्थिक उसनवारी करून दिवस काढावे लागतात. नगरपरिषदेची अनेक कामे ही अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला जात नाही. शासन ही बाब कधीच गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. यामुळे मागण्यामान्य न झाल्यास या पुढे कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.