दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:37 IST2026-02-04T18:36:29+5:302026-02-04T18:37:05+5:30

''आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला

Dabhad Murder Case: The killer of a 75-year-old woman is still at large, angry villagers march to Ardhapur tehsil! | दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड):
तालुक्यातील दाभड येथे ७५ वर्षीय पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या होऊन आठवडा उलटला, तरी आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज, बुधवारी दाभड येथील शेकडो ग्रामस्थांनी अर्धापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनावर धडक मोर्चा काढला. "आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

नेमकी घटना काय? गेल्या बुधवारी (२८ जानेवारी) पार्वतीबाई नेहमीप्रमाणे सकाळी शेताकडे गेल्या होत्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दाभड शिवारातील एका विहिरीजवळ त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. अज्ञात नराधमाने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची क्रूर हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

तपासावर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थ आक्रमक
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला, फॉरेन्सिक टीम पाचारण केली, मात्र आठवडा होऊनही हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. परिसरातील एका हॉटेलमधील संशयित नोकरही घटनेपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे, तरीही पोलिसांच्या हाती अद्याप ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. तपासाची चक्रे संथ गतीने फिरत असल्याचा आरोप करत आज सकाळी ११ वाजता दाभडमधील सर्व धर्मीय आणि सर्व समाजातील नागरिक एकत्र आले.

महिलांच्या सुरक्षेसाठी आक्रमक मागणी 
मोर्चादरम्यान तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर तब्बल ६०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. "परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा आणि मारेकऱ्याला तात्काळ गजाआड करा," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोलिसांनी तपासाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले असले, तरी आरोपीला अटक होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Web Title : दाभड हत्याकांड: 75 वर्षीय महिला की हत्या पर ग्रामीणों का प्रदर्शन

Web Summary : दाभड में 75 वर्षीय महिला की निर्मम हत्या के बाद आक्रोशित ग्रामीणों ने अर्धापूर तहसील में विरोध प्रदर्शन किया। जांच जारी रहने के बावजूद, हत्यारा अभी भी फरार है, जिससे गुस्सा और तत्काल गिरफ्तारी की मांग बढ़ रही है।

Web Title : Dabhadi Murder: Villagers Protest Inaction in 75-Year-Old Woman's Killing

Web Summary : Outraged villagers protested at Ardhapur Tehsil after the brutal murder of a 75-year-old woman in Dabhadi. Despite an ongoing investigation, the culprit remains at large, sparking anger and demands for immediate arrest and justice.