नांदेडमध्ये एक लाखाची लाच घेताना पीएसआयसह कॉन्स्टेबल जाळ्यात; पोलिस दलात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:14 IST2025-12-25T19:13:53+5:302025-12-25T19:14:41+5:30
या धडक कारवाईमुळे नांदेड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नांदेडमध्ये एक लाखाची लाच घेताना पीएसआयसह कॉन्स्टेबल जाळ्यात; पोलिस दलात खळबळ
नांदेड : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी आणि न्यायालयात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आणि एका पोलिस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे नांदेड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव यांच्याकडे तक्रारदाराच्या नातेवाइकांविरुद्ध दाखल असलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास होता. हे गुन्हे मिटवण्यासाठी आणि न्यायालयात लवकर दोषारोप दाखल करण्यासाठी जाधव यांनी सुरुवातीला ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर एक लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. २३ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ब्रह्मसिंग नगर भागातील तक्रारदाराच्या वडिलांच्या घरी सापळा रचला. यावेळी पीएसआय गोविंद जाधव यांनी पंचांसमक्ष एक लाख रुपयांची लाच स्वीकारली, तर पोलिस कॉन्स्टेबल वैजनाथ संभाजी तांबोळी यांनी या गुन्ह्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीने तत्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले असून पीएसआय जाधव यांच्याकडून एक शासकीय रिव्हॉल्व्हर, १० काडतूस आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई ला.प्र.वि.चे पोलिस निरीक्षक करीम खान पठाण, पोलिस उपअधीक्षक प्रशांत पवार आणि राहुल तरकसे यांच्या पथकाने पार पाडली.