महाराष्ट्र जिंकण्याचा काँग्रेसचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:42 IST2019-01-04T00:41:25+5:302019-01-04T00:42:53+5:30
स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अनावरण झाले. सामाजिक समतेचा, एकतेचा संदेश देणारा हा क्षण आहे.

महाराष्ट्र जिंकण्याचा काँग्रेसचा संकल्प
नांदेड : स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अनावरण झाले. सामाजिक समतेचा, एकतेचा संदेश देणारा हा क्षण आहे. अशा क्षणी सर्व सामान्यांचे, सर्व घटकांचे हित जपणाºया काँग्रेसचे सरकार आगामी निवडणुकीत राज्यात आणि देशात आणण्याचा निर्धार काँग्रेस पदाधिकाºयांनी व्यक्त केला. निमित्त होते राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नागरी सत्काराचे.
शहरातील मोंढा मैदानावर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांची अलोट गर्दी होती. मंचावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी संपतकुमार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण, बसवराज पाटील, आ. अब्दुल सत्तार, आ. अमर राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण, जि.प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शिलाताई भवरे यांच्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकात भाजपाचा सपाटून पराभव झाला. त्याचीच पुनरावृत्ती आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकातही दिसून येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला.
प्रारंभी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे भाषण झाले. भाजपा सरकार देशाला मागे घेवून जात असल्याचा आरोप करीत या सरकारचा प्रवास मनूस्मृतीच्या दिशेने सुरू असून देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण करणाºया भाजपाला सर्वांनी एकत्रित येऊन धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नांदेडमधील ही नागरी सत्काराची सभा उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगत हा सत्कार नव्हे तर संकल्प दिन आहे. पाच वर्षात विषमतेचे राजकारण करणाºया भाजपाला धडा शिकवून देशाचे वैभव पुन्हा आणण्यासाठी राहूल गांधींना पंतप्रधानपदी बसवू या, असे आवाहन केले. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमुळे महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेसमय झाल्याचे सांगत तीन मोठ्या राज्यात काँग्रेसने विजयी मिळविला आहे. येणाºया निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही परिवर्तन झालेले दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. खा. राजीव सातव यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मागील दीड वर्षापासून कर्जमाफीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरू असल्याचे सांगत काँग्रेसचे मुख्यमंत्री गहलोत यांनी पहिल्याच दिवशी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० जागा जिंकू, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पांडागळे यांनी तर आभार आ. अमरनाथ राजूरकर यांनी मानले. सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
फायनलही आम्हीच जिंकू
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेने महाराष्ट्र ढवळून निघाला. महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे, हे स्पष्ट झाले. नुकत्याच सेमी फायनल असलेल्या विधानसभा निवडणुकात तीन राज्यात काँग्रेस जिंकली. या विजयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. येणाºया निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची विजयी होईल. लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्धची फायनलही आम्हीच जिंकू, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारचे शेवटचे शंभर दिवस उरले आहेत. आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बॅटींगची वेळ आहे. तुफान फटकेबाजी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतक-यांविषयी काँग्रेसलाच आस्था
काळे धन परत आणणार होते, २ कोटी लोकांना रोजगार होते. काय झाले त्याचे? भाजप सरकारची साडेचार वर्षे केवळ गप्पा मारण्यात गेली. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतक-यांची दूर्दशा झाली आहे. ती थांबविण्याचे काम काँग्रेसचे सरकार प्राधान्याने करेल. त्यामुळे राहूल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवून महाराष्ट्रासह देशात सत्तांतर घडवा, असे आवाहन राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले. राहूल गांधी बोलतात ते करुन दाखवितात. राजस्थानमध्ये सत्ता आल्यानंतर पहिला निर्णय शेतकºयांच्या कर्जमाफीचा घेतला. काँग्रेस सरकारच हे करु शकते. त्यामुळे एकजुटीने निवडणुका लढवून भाजपाला धडा शिकवू, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.