भाजपची पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत; मनभेद टाळू; चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:48 IST2025-12-17T12:46:05+5:302025-12-17T12:48:45+5:30
काँग्रेस पार्टीला सोबत घ्यायला कोणी तयार नाही. महाविकास आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात आले.

भाजपची पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत; मनभेद टाळू; चंद्रशेखर बावनकुळे
नांदेड : पुणे - पिंपरीत अजित पवार हे ३०-३५ वर्षांपासून काम करीत आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. भाजपाचेही त्या ठिकाणी मोठे काम आहे. दोन्ही पक्षांकडून कार्यकर्तेही आहेत. एकत्र लढल्यावर जागाच उरत नाहीत. त्यामुळे आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला. अजितदादांनी स्वतंत्र लढावे आणि भाजपा महायुती म्हणून लढू. परंतु, या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री बावनकुळे हे मंगळवारी नांदेडात आले होते. ते म्हणाले, निवडणूक लढविताना सर्वस्व पणाला लावावे लागते. शेवटी दादांना पक्षाची लढाई लढताना त्यांना निवडणुकीसारखीच निवडणूक लढवावी लागणार आहे. आम्हीही सर्वस्व पणाला लावू. शेवटी मैत्रिपूर्ण लढलो तरी, त्यांना आणि आम्हालाही निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे महापौर राष्ट्रवादीचा होईल, आमचे म्हणणे आहे भाजपा महायुतीचा होईल. अजितदादांचे कार्यकर्ते किंवा अजितदादा महायुतीवर टीका टिप्पणी करणार नाहीत. महायुतीही त्यांच्यावर टीका करणार नाही. मनभेद तयार होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असे बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसला सोबत घ्यायला कोणी तयार नाही
काँग्रेस पार्टीला सोबत घ्यायला कोणी तयार नाही. महाविकास आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे वेगळे लढायची, त्यांची मानसिकता झाली आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही काँग्रेसच्या दावणीला जाण्याचा विचार करणार नाहीत. एका काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा अजेंडा स्वीकारला होता. आता त्यांनाही वाटत आहे की, काँग्रेससोबत गेल्याने आपली पार्टी संपत चालली आहे, असेही बावनकुळे म्हणाले.