मोठी बातमी! आणीबाणी काळातील महाराष्ट्रीयन बंदीवानांचा होणार शासकीय गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:43 IST2025-12-24T12:39:38+5:302025-12-24T12:43:31+5:30
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या राज्यातील ३,८१३ जणांना दोन महिन्यांचे मिळणार मानधन

मोठी बातमी! आणीबाणी काळातील महाराष्ट्रीयन बंदीवानांचा होणार शासकीय गौरव
नांदेड : आणीबाणीच्या काळात ज्या महाराष्ट्रीयन व्यक्तींनी बंदिवास भोगला आहे त्या सर्वांना नूतन वर्षाच्या प्रारंभी दोन महिन्यांचे मानधन देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्याचा निर्णय राज्य सरकारने २२ डिसेंबर रोजी घेतला आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात सविस्तर अध्यादेश जारी केला आहे. आणीबाणीच्या काळात अनेक जणांना तत्कालीन सरकारच्या कायदेशीर कार्यवाहीमुळे तुरुंगवास भोगावा लागला. या सर्व लोकशाहीप्रेमींचा सन्मान व यथोचित गौरव करण्यासाठी त्यांच्या तुरुंगवास कालावधीनुसार मानधन देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या मानधनाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे २७ जून २०२५ रोजी घेण्यात आला आहे.
आणीबाणी काळातील बंदिवानांची जिल्हानिहाय संख्या
मुंबई शहर ३९, मुंबई उपनगर ११७, ठाणे १२६, पालघर ११२, रायगड ४०, रत्नागिरी ७०, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ७८, जळगाव १७४, धुळे ३५, नंदुरबार २९, अहिल्यानगर १३३, पुणे ५०४, सातारा ६३, सांगली ८२, सोलापूर ६२, कोल्हापूर ७६, छत्रपती संभाजीनगर १४७, जालना ५६, बीड ५६, नांदेड १०३, हिंगोली १४८, परभणी ३१, लातूर १०६, धाराशिव २७, अमरावती ८३, बुलढाणा ४४७, यवतमाळ ६९, अकोला ८९, वाशिम १०, नागपूर ३९९, वर्धा ११४, भंडारा २५, गोंदिया २१ आणि चंद्रपूर ९९.
तुरुंगवास भोगणारे एकूण ३८१३
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या एकूण ३,८१३ जणांसाठी जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकूण २१ कोटी २० लाख ७६ हजार ८०३ रुपये निधी राज्य शासनातर्फे देण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या सर्वांना तत्काळ मानधन अदा करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी व संवितरण अधिकारी यांची राहील, असेही या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.