नांदेडमध्ये भोंदूबाबाचा शिष्येवर अत्याचार; नामांकित मठातील गुरूनेच लग्नाचे आमिष दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 05:59 IST2026-03-23T05:58:40+5:302026-03-23T05:59:44+5:30
आयुष्याच्या उतारवयात अध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

नांदेडमध्ये भोंदूबाबाचा शिष्येवर अत्याचार; नामांकित मठातील गुरूनेच लग्नाचे आमिष दाखवले
लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शहरातील एका नामांकित मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै २०२५ पासून सुरू होता. नंतर मात्र संन्यासी असल्याचे सांगून लग्नाला नकार देत पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाकण्याची धमकीही दिली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून, त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पीडित महिलेचे (वय ४७) बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, पतीचे निधन झाल्याने त्या एकट्याच राहतात.
आयुष्याच्या उतारवयात अध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. परिसरातील इतर महिलांसोबत त्या १२ मे २०२५ रोजी पौर्णिमेनिमित्त गाडीपुरा येथील प्रसिद्ध मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी पीडित महिलेची आरोपी संत हरिगीर दत्तगीर गिरी महाराज (वय ३८) यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर पीडित महिलेने जून महिन्यात संत हरिगीर दत्तगीर महाराज यांना गुरू केले. दर गुरुवारी त्या मठामध्ये गुरूच्या दर्शनासाठी जात होत्या. एके दिवशी महाराजांनी पीडितेचा मोबाइल नंबर घेऊन आपलाही नंबर दिला. त्यावरून रात्री उशिरापर्यंत हरिगीर महाराज हे पीडितेशी बोलत होते.
१६ जुलै रोजी ते पीडितेच्या घरी आले. पीडितेने हरिगीर याची पाद्यपूजा करीत आशीर्वादही घेतले. त्यावेळी पीडितेने विरोध केला असताना महाराजाने जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही दोन वेळेस या भोंदूबाबाने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपी भाेंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
पीडिता विधवा असल्याने घेतला गैरफायदा
हरिगीर महाराज याने पीडिता ही विधवा असल्याची संधी साधून अत्याचार केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखविले होते. परंतु, नंतर मात्र संन्यासी असल्याने लग्न करता येत नाही असे म्हणत नकार दिला. तसेच वेळोवेळी पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक, अशी धमकीही हरिगीर याच्याकडून देण्यात येत होती.