गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 19:03 IST2025-07-03T19:02:06+5:302025-07-03T19:03:29+5:30
बंधाऱ्यात उरला ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा; २९ ऑक्टोबरपर्यंत दरवाजे राहणार उघडे

गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात
धर्माबाद (जि. नांदेड) : तालुक्यातील गोदावरी नदीवर बाभळी (ध) येथे २५० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी उघडण्यात आले. सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पहिला दरवाजा उघडला. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वच १४ ही दरवाजे उघडण्यात आले. बंधाऱ्यात जमा असलेले १०.०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तेलंगणात सोडण्यात आला. आता केवळ ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. सर्व दरवाजे २९ ऑक्टोबरपर्यंत वर राहणार आहेत.
यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता एम.एल.फ्रँकलिन, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता एम.चक्रपाणी, सहायक कार्यकारी अभियंता के.रवि, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोड, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता सी.डी.पोतदार, कनिष्ठ अभियंता धनंजय गव्हाणे, एस.बी.देवकांबळे आदी उपस्थितीत होते. महाराष्ट्राने कोट्यवधी रुपये खर्च केला,पण त्याचा फायदा तेलंगणा राज्याला होत आहे. जमा झालेले पाणी मोफत तेलंगणात जात आहे. यासंदर्भात राज्य शासन लक्ष देण्यास तयार नाही.
सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले व यावर २८ फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीन अटी टाकत पुढीलप्रमाणे निकाल दिला. १ जुलै रोजी बंधाऱ्याचे सर्व गेट वर उचलणार व २९ ऑक्टोबर रोजी बंधाऱ्याचे सर्व गेट खाली टाकण्यात येणार. १ मार्च रोजी बंधाऱ्यातील पाणीसाठा पैकी (०.६०) शून्य दशांश साठ टीएमसी पाणी श्रीराम सागरला ( पोचमपाड धरण) सोडावे.
या वादग्रस्त बंधाऱ्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर २०१४ रोजी झाले. त्यावर्षी उशिरा पर्जन्यमान झाल्यामुळे जेमतेम पाणीसाठा बंधाऱ्यात शिल्लक राहिला. त्यानंतर मात्र गेली अकरा वर्षे झाले बंधाऱ्याचे गेट उघडण्याची तारीख ऐन पावसाळ्यात १ जुलै रोजी आहे. पावसाळ्यातच ही तारीख असल्याने पावसाळ्यातील पाणी तेलंगणात निघून जात आहे. बंधाऱ्यात आजपर्यंत २.७४ टीएमसी पाणीसाठा कधीच उपलब्ध झाला नाही. २५० करोडो रुपये खर्चून बांधलेला बाभळी बंधारा कोरडाच राहत असल्याने बंधाऱ्याचे गेट टाकून काय फायदा? असा प्रश्न संतप्त जनतेतून ऐकायला मिळत आहे.