शिक्षकी पेशाला काळिमा! दारू पिऊन शाळेत शिक्षकाचा धिंगाणा; विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:46 IST2025-12-06T17:44:37+5:302025-12-06T17:46:43+5:30
'धक्कादायक' Video व्हायरल, ज्या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शिक्षण मिळायला हवे, त्याच शाळेत शिक्षकाकडून असे गैरवर्तन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिक्षकी पेशाला काळिमा! दारू पिऊन शाळेत शिक्षकाचा धिंगाणा; विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन
- नितेश बनसोडे
माहूर (नांदेड): 'गुरु'ला देवाचे स्थान देणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार माहूर तालुक्यातील शेकापूर येथे उघडकीस आला आहे. मौजे शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारूच्या नशेत चक्क शाळेतच धिंगाणा घातला. मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसोबत अश्लील भाषेत बोलताना आणि विचित्र डान्स करतानाचा त्यांचा धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
शिक्षकाच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत
व्हायरल झालेला हा व्हिडिओ शुक्रवार (दि. ५) चा असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षक अनंत वर्मा हे नेहमीप्रमाणे शाळेत दारूच्या नशेत आले होते. वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी ते त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत होते. इतकेच नाही तर ते अधूनमधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात होते आणि विचित्र हातवारे व डान्स करत होते. हा सर्व प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून, शिक्षकाच्या अशा विकृत वागण्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ज्या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शिक्षण मिळायला हवे, त्याच शाळेत शिक्षकाकडून असे गैरवर्तन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वास्थ्य बिघडविण्यासोबतच त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या या शिक्षकावर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षण विभागाने तातडीने शिक्षक अनंत वर्मा यांना निलंबित करावे आणि गुन्हे दाखल करण्याची कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेकापूर येथील पालकवर्ग आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.