नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाक घरात; दोन शेतकऱ्यांना संवादाची संधीही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:59 IST2025-10-08T15:43:13+5:302025-10-08T15:59:25+5:30
नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा; दोन शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी

नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाक घरात; दोन शेतकऱ्यांना संवादाची संधीही
- शरद वाघमारे
मालेगाव (जिल्हा नांदेड): पंतप्रधान धन्य, धान्य, कृषी योजनेचा शुभारंभ ११ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड येथील दोघांशी संवाद साधणार आहेत, ज्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या संवादासाठी निवड झालेल्यांमध्ये विज्ञान केंद्र नांदेड येथील कृषी विद्या तज्ञ प्रा. संदीप जायेभाय आणि अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कृषी भूषण भगवानभाई इंगोले यांचा समावेश आहे. या दोघांनाही पंतप्रधानांशी थेट चर्चा करण्याची मोलाची संधी मिळाली आहे.
'धन्य, धान्य, कृषी योजना': शेतकऱ्यांसाठी संजीवनी
पंतप्रधान धन्य, धान्य, कृषी योजनेचा मुख्य उद्देश शेतीचे उत्पादन वाढवणे, पिकांमध्ये विविधता आणणे, सिंचन आणि धान्य साठवण सुविधा सुधारणे, तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून, पहिल्या टप्प्यात १०० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या योजनेतून खालील उद्दिष्ट्ये साध्य करण्याचा प्रयत्न आहे:
- शेतकऱ्यांच्या शेती उत्पादकतेत वाढ करणे.
- शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे.
- पायाभूत सुविधा सुधारणे: सिंचनाच्या सोयी वाढवणे आणि धान्य साठवणुकीसाठी ग्रामपंचायत व गट स्तरावर सुविधा निर्माण करणे.
- शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मालेगावच्या शेतकऱ्यांची सेंद्रिय शेती
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कृषी भूषण भगवान इंगोले हे आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर करतात. विषमुक्त शेती म्हणून त्यांच्या उत्पादनाची ओळख असून, त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय पद्धतीच्या हळदीला राज्यभरात मोठी मागणी आहे. या कार्यक्रमादरम्यान भगवान इंगोले हे त्यांनी उत्पादित केलेली सेंद्रिय आणि विषमुक्त हळद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देणार आहेत.
नैसर्गिक शेती काळाची गरज
आपल्या भावना व्यक्त करताना कृषीभूषण भगवान इंगोले म्हणाले, "शेतीत सातत्याने रासायनिक खतांचा वापर केल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. विषमुक्त नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती लागवड करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट चर्चा करण्याची मला संधी मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद आहे."