तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 19:33 IST2022-07-12T19:32:40+5:302022-07-12T19:33:17+5:30
तेलंगणा ते गुजरात बेकायदेशीररित्या राशनचे धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक जप्त

तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त !
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : तेलंगणा येथून गुजरातला बेकायदेशीररित्या काळ्या बाजारात जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अर्धापूर ठाण्याच्या पथकाने पकडला असून सदर प्रकरणी अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अर्धापूर तालुक्यातील दाभड हाद्दीतील सत्य गणपती मंदिराच्या शेजारी चौधरी हॉटेलजवळ सोमवार रोजी सायंकाळी दोन ट्रक राशनचा माल असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या पथकाला मिळाली. यावरून अर्धापूर पोलीस पथकाने ट्रकमधील मालाची पाहणी केली असता तांदुळ आढळून आला. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक चालक व तांदूळ मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलंगणा ते गुजरात बेकायदेशीररित्या राशनचे धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रक क्रमांक ( जी.जे. २५ यु.८०९७ ),व ( जी.जे ३६.व्ही. २९७९ ) या दोन्ही ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोत्यामध्ये राशनचा तांदूळ २७ टन किंमत १२ लाख रुपये असा एकुण मुद्देमाल ३७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ शासकीय परवाना नसतांना बेकायदेशीररित्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला मिळाल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी हिराभाई रामाभाई सिंधल रा. राणावाव ता. रानावाव जि. पोरबंदर, भरत चन्नाभाई ओडेदरा वय ३२ चालक रा. देवडा ता.कुतीयला जि.पोरबंदर गुजरात यांच्या सह तांदुळ मालक दोघेजण यांच्या विरूद्ध कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस नाईक राजेश घुन्नर हे करीत आहेत.