तुमचे कॉलगेट, झंडू बाम, गुडनाइट फेक तर नाहीत ना? नागपूरमध्ये १० कोटींचा बनावट माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:07 IST2025-09-25T16:06:29+5:302025-09-25T16:07:48+5:30
Nagpur : १.५ कोटीच्या लक्ष्मणरेखासह इनो, ऑल आउट, दंतकांती, हापिंक, क्लोजअप, सेन्सोडंट व अन्य बनावट उत्पादने जप्त

Your Colgate, Zhandu Balm, Goodnight are not fake, are they? Fake goods worth 10 crores seized in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट मालाचे उत्पादन, पॅकेजिंग आणि मार्केटिंग करणाऱ्या तीन कारखान्यांवर मुंबई येथील मिडास हायजिन इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता धाडी टाकून त्यांच्या लक्ष्मणरेखा या दीड कोटींच्या उत्पादनांसह अन्य नामांकित कंपन्यांची उत्पादने असा एकूण १० कोटींचा माल जप्त केला. या कारवाईसाठी वाठोडा पोलिसांची मदत घेण्यात आली.
धाडीची कारवाई वाठोडा, भांडेवाडी परिसरातील संघर्षनगर येथील कारखाना व पॅकेजिंग युनिट, जरीपटका भागातील नीत्या पॅकेजिंग व हिंदुस्थान मार्केटिंग युनिट आणि उमरेड रोडवरील उमरगाव येथील कारखाना व पॅकेजिंग युनिटवर करण्यात आली. याप्रकरणी जरीपटका, हेमू कॉलनी येथील रहिवासी दीपक हेमू कॉलनी येथील रहिवासी दीपक कन्हैयालाल तलरेजा (५२) हा आरोपी असून धाडीची खबर मिळताच तो फरार झाला. मिडास हायजिन इंडस्ट्रीज कंपनीचे उपाध्यक्ष सुधीर वडगावकर यांनी पोलिसांसोबत आरोपीच्या जरीपटका येथील घरीही धाड टाकली. तलरेजा याचा जरीपटका येथील कारखान्याचे काम पाहणारा व्यवस्थापक हेमंत इंद्रसेन पखरानी हासुद्धा फरार झाला, तर उमरगाव येथील कारखान्यातून अन्य व्यवस्थापक सचिन देशमुख याला पोलिसांनी अटक केली.
सुधीर वडगावकर यांनी सांगितले, एका सर्व्हेत गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीच्या लक्ष्मणरेखा या उत्पादनाची विक्री झपाट्याने कमी झाल्याचे आणि कंपनीचा बनावट माल बाजारात विक्रीला असल्याचे आढळून आले. माहितीच्या आधारे आणि पोलिसांच्या मदतीने आम्ही आरोपीच्या वाठोडा, जरीपटका आणि उमरेड रोडवरील उमरगाव येथील कारखान्यांवर एकाचवेळी धाडी टाकल्या. लक्ष्मणरेखा उत्पादनासह कंपनीचा होलोग्राम आणि अन्य कंपन्यांचे इनो, गुडनाइट, दंतक्रांती टूथपेस्ट, ऑल आउट, झंडू बाम, हार्पिक, क्लोजअप, सेन्सोडंट आणि अन्य उत्पादने आढळून आली. तीसुद्धा जप्त करण्यात आली.
तलरेजा बनावट उत्पादने निर्मितीत तरबेज
दीपक तलरेजा हा नामांकित कंपन्यांची बनावट उत्पादने निर्मितीत तरबेज असून सराईत गुन्हेगार आहे. तो सन २०२१ पासून या व्यवसायात लिप्त आहे. त्याला यापूर्वी अशाच प्रकरणांमध्ये वाडी, जबलपूर आणि रायपूर येथील पोलिसांनी अटक केली होती. या धाडीमुळे कारखान्यामागील रॅकेट उघडकीस आले आहे.