नागपुरात युवतीची गळफास लावून आत्महत्या; उलटसुलट चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 17:31 IST2022-04-22T17:23:10+5:302022-04-22T17:31:07+5:30
संगीताचा गुरुवारी पेपर होता. त्याची तयारी सुरू असतानाच, तिने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली.

नागपुरात युवतीची गळफास लावून आत्महत्या; उलटसुलट चर्चेला उधाण
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
संगीता परमेश्वर रॉय (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. तिचे कुटुंबीय मूळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने पाच-सहा वर्षांपूर्वी ते नागपुरात आले आणि येथे स्थिरावले. सध्या ते काळमेघ नगरात राहतात. संगीताची आई घरकाम करते, तर वडील कंपनीत रोजंदारीवर कामाला जातात. तिला चार बहिणी आहेत. शाळेत नाव घालायला खूप उशीर झाल्याने, संगीता सध्या नववीत शिकत होती, असे पोलीस सांगतात.
संगीताचा गुरुवारी पेपर होता. त्याची तयारी सुरू असतानाच, तिने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळल्यानंतर, ठाणेदार उमेश बेसरकर आणि सहकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यांनी संगीताच्या आत्महत्येमागचे कारण जाणून घेण्यासाठी घराची तपासणी केली. मात्र, सुसाइड नोट किंवा असेच काही दुसरे आढळले नाही. त्यामुळे तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तिचा मोबाइल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वीच झाला बर्थ डे
१८ एप्रिलला संगीताचा वाढदिवस होता. तिने तो सेलिब्रेट केला आणि त्यानंतर तीनच दिवसांनी गळफास लावून घेतला.
आठवड्यापूर्वी घर बदलले
संगीताचे कुटुंबीय यापूर्वी दुसऱ्या भागात राहात होते. नुकतेच ते काळमेघनगरात राहायला आले. यामागे संगीताला कुणी त्रास देत असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत.