नागपुरातील पॉश वस्तीतून दिवसाढवळ्या दारव्ह्यातील तरुणाचे अपहरण

By योगेश पांडे | Updated: April 18, 2025 23:17 IST2025-04-18T23:17:51+5:302025-04-18T23:17:51+5:30

अपहृताने अनेकांकडून उकळले आहेत पैसे; दुचाकीला धडक देऊन कारमध्ये डांबले

Young man was kidnapped in broad daylight from a posh area in Nagpur | नागपुरातील पॉश वस्तीतून दिवसाढवळ्या दारव्ह्यातील तरुणाचे अपहरण

नागपुरातील पॉश वस्तीतून दिवसाढवळ्या दारव्ह्यातील तरुणाचे अपहरण

नागपूर : रामदासपेठच्या पॉश वस्तीतून दिवसाढवळ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणीसह तीन जणांना अटक करत तरुणाची सुटका केली आहे. अपहृत तरुणाने अनेकांकडून पैसे उकळल्यामुळे बरेच जण त्याच्या मागावर आहेत हे विशेष.

महावीर कोठारी (२८) असे अपहृत तरुणाचे नाव आहे. तर सलमान खान पठाण, मजहर खान पठाण आणि पिंकी नावाची मुलगी हे आरोपी आहेत. कोठारीने अनेक लोकांकडून सरकारी योजना आणि नोकरी देण्याचे आश्वासन देऊन पैसे उकळले आहेत. त्याने दारव्हा व अमरावती येथील अनेकांना जाळ्यात ओढले होते. फसवणूक झालेले लोक सातत्याने त्याच्या मागे पैसे परत मागण्याचा तगादा लावत होते. त्यामुळे महावीरने अमरावतीतूनदेखील पळ काढला व तो रामदासपेठ येथील अक्षय अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. पठाण बंधूंना कोठारीने एक लाख रुपयांचा गंडा घातला होता. कोठारी नागपुरात असल्याचे कळताच दोघेही नागपूरला पोहोचले. त्यांची मैत्रीण पिंकी नागपूरला राहते. पिंकीसह पठाण बंधू कारने रामदासपेठला पोहोचले. संध्याकाळी ५.३० वाजता, कोठारी रामदासपेठ येथील जैन मंदिराजवळ दुचाकीवरून जात होता. आरोपींनी कारमधून त्याचा पाठलाग केला. जैन मंदिराजवळ त्याच्या दुचाकीला त्यांनी धडक दिली. त्यानंतर तो खाली पडला. आरोपी गाडीतून खाली उतरले आणि कोठारीला मारहाण करू लागले. त्यांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये घातले आणि पोबारा केला. घटनास्थळावरील लोकांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. एकाने कारचा नंबर नोंदविला होता. पोलिसांनी कारच्या क्रमांकाच्या आधारे काही वेळातच आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी वाडीच्या दिशेने गेले होते. पोलिसांनी तेथे जाऊन कोठारीची सुटका केली व तीनही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींविरोधात पोलिसांनी अपहरण, हल्ला व धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

एक लाखांच्या वसुलीसाठी अपहरण

एक लाखांच्या वसुलीसाठी पठाण बंधूंनी कोठारीचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्या दुचाकीला धडक लागल्यावर घटनास्थळावरील लोकांना अपघातानंतर झालेला वाद वाटला. मात्र प्रत्यक्षात आरोपी त्याचे अपहरण करण्याच्याच उद्देशाने आले होते.

Web Title: Young man was kidnapped in broad daylight from a posh area in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.