नागपुरात तरुणाचा क्रिकेट मैदानावर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 23:34 IST2019-12-09T22:47:24+5:302019-12-09T23:34:52+5:30
क्रिकेट खेळता खेळता चक्कर येऊन पडल्याने रविवारी सायंकाळी खरबीतील एका तरुणाचा करुण अंत झाला. निखिल दीपक पळसापुरे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नागपुरात तरुणाचा क्रिकेट मैदानावर मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेट खेळता खेळता चक्कर येऊन पडल्याने रविवारी सायंकाळी खरबीतील एका तरुणाचा करुण अंत झाला. निखिल दीपक पळसापुरे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो साईबाबानगर खरबी येथे राहत होता.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावीर गार्डनच्या बाजुला एक क्रिकेट मैदान आहे. या मैदानावर निखिल त्याच्या मित्रांसोबत रविवारी सायंकाळी क्रिकेट खेळत होता. बॅटिंग करताना अचानक शॉट मारण्याच्या तयारीत असताना निखिल मैदानावर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेच बाजुच्या खासगी ईस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याला खेळता खेळता हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज आहे.
निखिलला आईवडील, लहान भाऊ आणि बहिण आहे. निखिल औषध कंपनीत एमआर म्हणून कार्यरत होता. रोजगाराच्या निमित्ताने नेहमी बाहेर जावे लागत असल्याने रविवारी सुटीच्या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत राहायचा, खेळायचा. तो सैतवाल जैन समाजाचा सक्रीय कार्यकर्ता होता आणि विविध सामाजिक, सेवाभावी उपक्रमात तो पुढे राहायचा. त्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर मित्रपरिवारालाही जोरदार मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, कोतवाली पोलिसांनी चंद्रकांत कमलाकर पळसापुरे (वय ५१) यांच्या सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.