तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू ! बाप नाही, आई व्यसनाधिन.. स्वतः नरकातून बाहेर पडलेल्या बहिणीची भावांना वाचवण्याची मर्मस्पर्षी कथा
By नरेश डोंगरे | Updated: February 21, 2026 20:13 IST2026-02-21T20:11:36+5:302026-02-21T20:13:45+5:30
Nagpur : बाप हयात नाही अन् माय व्यसनाधिन. फुटपाथवर, घाणेरड्या जागी राहून ती आपले व्यसन भागविण्यासाठी पोटच्या वाढत्या मुलीला रस्त्यावर भिक मागायला लावत होती.

You too will have tears in your eyes! No father, mother addicted.. A touching story of a sister who came out of hell herself and saved her brothers
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाप हयात नाही अन् माय व्यसनाधिन. फुटपाथवर, घाणेरड्या जागी राहून ती आपले व्यसन भागविण्यासाठी पोटच्या वाढत्या मुलीला रस्त्यावर भिक मागायला लावत होती. भिक्षेकरी पुनर्वसन पथकाच्या हाती ती लागली अन् तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शिक्षणामुळे तिला बरे वाईट समजू लागताच तिच्यातील बहिण जागी झाली अन् तिने प्रशासनाच्या मदतीने अत्यंत धोकादायक जिवन जगणाऱ्या आपल्या दोन भावंडांचे भवितव्य सुरक्षित केले. एखाद्या चित्रपटाची वाटावी अशी ही कथा फुटपाथवर जगनाऱ्या उपेक्षित घटकातील जिवांची आहे.
नागपूरचा संत्रा देशात प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच येथील संत्रा मार्केटही सर्वदूर ओळखीचे आहे. रेल्वे स्थानकानजिक असलेल्या संत्रा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या वाहनांची वर्दळ अन् मजूरांचा राबता असतो. हे मजूर कोण, कुठले, त्याची कुणाला माहिती नसते अन् ती करून घेण्याची कुणाला आवश्यकताही वाटत नाही. रात्रंदिवस काम करायचे, थकले भाकले की मिळेल त्या ठिकाणी अंग टाकायचे. ओळखीची मजूर मंडळी, गुन्हेगारी वृत्तीचे ऑटोचालक अगतिक महिला मजुरांचे शोषण करतात. त्यांना दारू, गांजा अन् खर्राचे व्यसनही लावतात.
व्यसनाधिन झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांना सिग्नलवर भिक मागायला लावतात. शहर प्रशासनाच्या भिक्षेकरी हटाव मोहिमेत ६ वर्षांपूर्वी दिव्या (नाव काल्पनिक, तेव्हाचे वय १३ वर्षे) सापडली. प्रशासनाने दिव्याला शाळेत घातले. दरम्यान, दिव्याचे वडील हयात नाही. आई पूर्णपणे व्यसनाधिन. तिने एका मजुराशी घरोबा करून फुटपाथवरच संसार थाटला. त्यातून तिला दोन मुले झाली. आज ही मुले सात आणि आठ वर्षांची आहेत.
सहा वर्षांपासून महिला व बालविकास विभागाच्या गृहात राहून शिकणारी दिव्या आज १२ वीत शिकते. अत्यंत हुशार आणि संवेदनशिल दिव्याला आपल्या चिमकल्या भावंडाची नेहमी काळजी असायची. फाटके कपडे घालून ते दोघे फुटपाथवरच्या घाणीत राहतात. भिक्षा मागतात. मिळेल ते खातात. त्यांचे भवितव्य काळोखमय असल्याची कल्पना असल्याने ती बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना नेहमी आपल्या भावांना सुरक्षित करण्यासाठी विनंती करायची.
प्रशासनाला ही माहिती कळाली आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी तिच्या भावांची सुटका करण्यासाठी संरक्षण अधिकारी साधना हटवार, सामाजिक सुरक्षा विभागाचे दीपक झाडे, लता गवई, संजय सोनवणे, चाईल्ड हेल्पलाईनच्या मीनाक्षी धडाडे, अनिकेत भिवगडे, रोशनी मेश्राम तसेच प्रियंका होटे आणि अश्विनी चोरे आदींचा समावेश असलेले एक संयुक्त विशेष पथक तयार केले. शुक्रवारी दुपारी या पथकाने संत्रा मार्केट पुलाखाली शोध मोहीम राबवून दिव्याचे दोन्ही भाऊ कुणाल आणि विनय (नावे काल्पनिक, वय ७ आणि ८ वर्षे) ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करवून घेतली.
ते भांबावले, ती मात्र सुखावली !
कुणाल आणि विनय यांना त्यांची एक मोठी बहिणही आहे, याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे विशेष पथकाने ताब्यात घेतल्यानंतर ते भांबावले. मात्र, आपले चिमुकले भाऊ जवळ आल्याने ती विलक्षण सुखावली. तिने त्यांचे लाडकोड केले. रक्ताच्या नात्याची, प्रेमाची उब मिळाल्यामुळे की काय, ते दोघेही तिच्यासोबत काही वेळेतच मिसळले. पुढचे दोन तीन दिवस ते दिव्यासोबतच राहणार आहेत.
शिक्षण आणि संगोपण करणार प्रशासन
या दोघांना आता बहिणीसोबत बालगृहात ठेवले जाणार आहे. त्यांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारीही प्रशासनाने स्वीकारली आहे. बालपणातच तिरस्कृत, विखारी नजरा आणि उपेक्षेचे चटके भोगणारी दिव्या या घडामोडीमुळे कमालीची आनंदीत आहे. आपल्या निरागस भावांना फुटपाथवरच्या नरकयातनांतून बाहेर काढण्यात आल्यामुळे त्यांचे भवितव्य सुरक्षित होण्याची खात्री दिव्याला पटली आहे. दिव्याची साद ऐकून तिला दाद देणाऱ्या नागपूर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाचेही या कामगिरीच्या निमित्ताने सर्वत्र कौतुक होत आहे.