"माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल.." नामांकित विमा कंपनीच्या चॅनल हेडकडून महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:04 IST2026-02-02T19:03:38+5:302026-02-02T19:04:22+5:30
Nagpur : एका नामांकित विमा कंपनीच्या चॅनल हेडकडून महिला कर्मचाऱ्याला टर्मिनेशनची कारवाई टाळण्यासाठी शरीरसुखाची मागणी करण्यात आली. तसेच त्याने वर्षभराअगोदर विमानात तसेच विदेश दौऱ्यातदेखील लगट करण्याचा प्रयत्न केला.

"You have to spend the night with me.." Channel head of a renowned insurance company demands physical pleasure from a female employee
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका नामांकित विमा कंपनीच्या चॅनल हेडकडून महिला कर्मचाऱ्याला टर्मिनेशनची कारवाई टाळण्यासाठी शरीरसुखाची मागणी करण्यात आली. तसेच त्याने वर्षभराअगोदर विमानात तसेच विदेश दौऱ्यातदेखील लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवीवा लाइफ इन्शुरन्स कंपनीतील चॅनल हेड चयन गुप्ता (५०, गुरुग्राम) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित महिला कर्मचारी कार्यालयीन कामामुळे गुप्ताच्या संपर्कात होती. डिसेंबर २०२४ मध्ये ती कंपनीचे इतर सहकारी व गुप्तासोबत पोर्तुगाल येथे गेली होती. विमानात गुप्ताने त्याच्या बाजूच्या जागेवर येण्यासाठी वारंवार तिला म्हटले होते. ८ डिसेंबर २०२४ ला लिस्बन येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यावर गुप्ताने तिला हॉटेलच्या रूमवर बोलविले. मात्र, एकटीने जाणे योग्य न वाटल्याने तिने तेथे जाणे टाळले. १० डिसेंबर रोजी त्याने परत तिला बोलविले.
गुप्ताने तिला बोलाविण्यासाठी मुंबईतील टीमने रूमवर यावे असा ग्रुपवर मॅसेज केला होता. मात्र, ती इतर तीन सहकाऱ्यांना घेऊन गेली. ते पाहून गुप्ता संतापला व तू एकटी का आली नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने सर्वांना मद्य पिण्याची ऑफर दिली. महिला तेथे केवळ बसून होती. नागपूरला पोहोचल्यावर इतर वरिष्ठांच्या कानावर तिने हा प्रकार घातला व कंपनीला तक्रारीचा ई-मेलदेखील केला. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी कंपनीतील सहकाऱ्याला इन्सेन्टिव्हची मागणी करण्याचा ठपका लावत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तिने योग्य ती उत्तरे सादर केली. मात्र, नोव्हेंबर महिन्यात तिला टर्मिनेट करण्यात आले.
काही दिवसांनीच तिला हाँगकाँग दौऱ्यावरदेखील जायचे होते. मात्र, त्याअगोदर तिला टर्मिनेशनचा ई-मेल मिळाला. त्याच दिवशी गुप्ताने तिला फोन केला व तिचे टर्मिनेशन वापस घेणे शक्य असल्याचे म्हटले. हाँगकाँगला गेल्यावर माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल, अशी त्याने मागणी केली. त्यानंतर महिलेने कंपनी, शी-बॉक्स पोर्टल येथे तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर तिने कामगार न्यायालयात तक्रार केली. तिने अजनी पोलिस ठाण्यातदेखील धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून चयन गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.