योगाचे महत्त्व आपल्याला कळलेच नाही

By Admin | Updated: June 8, 2015 03:00 IST2015-06-08T03:00:12+5:302015-06-08T03:00:12+5:30

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. परंतु आपल्या देशातील लोकांना आपल्याच येथील योगासनांचे महत्त्व कळालेले नाही.

You do not understand the importance of yoga | योगाचे महत्त्व आपल्याला कळलेच नाही

योगाचे महत्त्व आपल्याला कळलेच नाही

नितीन गडकरी : गो-विज्ञानाच्या प्रयोगांना लोकमान्यता मिळावी
नागपूर : २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. परंतु आपल्या देशातील लोकांना आपल्याच येथील योगासनांचे महत्त्व कळालेले नाही. बाहेरील देशांत मात्र याला मोठा सन्मान आहे. आयुर्वेद, गो-विज्ञान यांच्याबाबतीतदेखील अशीच स्थिती आहे. आपल्या विज्ञानावर आपल्याला आत्मविश्वासच नाही. ही स्थिती बदलायला हवी, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गो-विज्ञान संशोधन केंद्राच्यावतीने शुक्रवार तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात ‘पंचगव्य आयुर्वेद चिकित्सा’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अनिल सोले होते. तर ‘नीरी’चे जेष्ठ वैज्ञानिक डॉ.हेमंत पुरोहित, विश्व हिंदू परिषदेचे हेमंत जांभेकर, प्रशांत हरताळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय संस्कृतीचा इतिहास फार जुना आहे आणि यातील विज्ञान आजच्या युगातही फायद्याचे आहे. या पुरातन ज्ञानाला आधुनिक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड मिळणे आवश्यक आहे. गो-विज्ञानातील प्रयोग लोकांसमोर येणे आवश्यकआहे. त्यामुळे प्रयोग करुन ते जनतेसमोर मांडायला हवे. गो-विज्ञानाचे प्रयोग व औषधांना राजमान्यतेसोबतच लोकमान्यतादेखील हवी. काही बाबींंचे तर व्यावसायिक दृष्टिकोनातून सादरीकरण व्हायला हवे, असेदेखील गडकरी म्हणाले. गो-विज्ञान केंद्र व गोरक्षण यांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीची देशी गायीची संतती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. गो-विज्ञान केंद्राच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसांत परिश्रम घेणारे दिवंगत श्याम बल्लाळ यांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान, गो-विज्ञान केंद्रात पंचगव्यापासून निर्माण होणाऱ्या औषधांमुळे कर्करोग, किडनीविकार यांनी त्रस्त रुग्णांना किती व कसा फायदा झाला याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वैद्य डॉ.अनुराधा गोस्वामी व डॉ.नंदिनी भोजरात यांनी सादरीकरणदेखील केले. सनत गुप्ता यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)

Web Title: You do not understand the importance of yoga