लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी गुंतवणूक आणली जात होती. मात्र, ऑटोमोबाईल इंडस्ट्री विदर्भात आली नव्हती. त्यासाठी प्रयत्न सुरू होते. आज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून पहिल्यांदा नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे. नागपुरात महिंद्रा कंपनीने १५ हजार कोटींची गुंतवणूक करीत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ-२०२६’ चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल ,शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर ,आ. परिणय फुके, आ. चरणसिंह ठाकूर, आ. सुमित वानखेडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अल्बलगन, कांचनताई गडकरी, उद्योजक पद्मश्री सत्यनारायण नुवाल, कौस्तुभ धवसे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक वर्षांपासून नागपुरात ऑटोमोबाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते ते आज फळाला आले आहेत. महिंद्रा ॲड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे. या गुंतवणुकीतून भारत आणि जागतिक बाजारासाठी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक व्हेईकल आणि ट्रॅक्टरचे नागपुरात उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी आजच जागा निश्चितच करण्यात येणार आहे. कंपनीने संभाजीनगर येथे पुरवठा केंद्र तर नाशिक येथे विस्तार केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर राज्यात आता नागपूर,नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल परिसंस्था निर्माण होणार आहे.
एन मोटिव्ह या जर्मनी कंपनीसोबत प्रथमच गीगा कास्टिंग तंत्रज्ञानाधारित तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात १० हजार कोटींचा करार झाला आहे. भविष्यात २५०० कोटींच्या गुंतवणुकीतून याचा विस्तार होणार असून ८० टक्के उत्पादनाची निर्यात होऊन ६ हजार प्रत्यक्ष व १० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, रेल्वे व विमानवाहतूक बळकट करण्यात येईल, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचेकाम याच वर्षी सुरू होईल. विदर्भातील पर्यटन क्षेत्रातील मोठ्या संधींचा उपयोग येथील विकासकरिता करण्यात येईल. या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधन्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर-अमरावती औद्योगिक मॅग्नेट
राज्याच्या समतोल विकासासाठी उद्योग धोरण आखण्यात आले असून ज्या भागात उद्योग नाहीत अशा भागांचाही विकास साधला जाणार आहे. यासाठी राज्यात मॅग्नेट औद्योगिक क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. कोकणात रायगड, मराठवाड्यात संभाजीनगर तर विदर्भातही नागपूर आणि अमरावती असे मॅग्नेट तयार करण्यात आले आहेत. नागपूर मॅग्नेटद्वारे गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांचा औद्योगिक विकास करण्यात येत आहे. या भागात स्टिल हब तयार करण्यात येत आहे. गॅसबेस एनर्जीसाठी प्रयत्न सुरु असून येत्या काळात ग्रीन स्टील हब म्हणून या भागाचा विकास करण्यात येणार आहे.
अमरावती मॅग्नेटद्वारे अमरावती येथे पहिल्या टेक्सटाईल पार्कनंतर दुसरा टेक्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. अमरावती विमानतळाचा विस्तार करण्यात येईल येथेच आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असून येत्या जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अमरावती मॅग्नेटच्या माध्यमातून यवतमाळ, अकोला,वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होईल.
अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक जीत अदानी, पद्मश्री सत्यनारायण नुवाल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अल्बलगन यांनीही मनोगत व्यक्त केले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे प्रास्ताविक केले. संचालन वसुंधरा काशिकर यांनी केले तर निर्भय संचेती यांनी आभार मानले.
येत्या ५ वर्षात ५ लाख रोजगार निर्मिती - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या ५ वर्षात विदर्भात ५ लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात ७.५ लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. विदर्भातील लोखंड, कोळसा, मँग्निज या खनिज संपत्तीसह कापूस, संत्रा उत्पादन व पर्यटन क्षेत्राच्या बलस्थानांना कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विदर्भाला संपन्न बनविण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.
पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांचा विशेष सत्कार
सुपर मेटल्स लि.कंपनी, महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूह, एन मोटीव्ह इंडिया-जर्मन आणि जीआयडीसी या कंपन्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाले. विदर्भात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक जीत अदानी, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे सीईओ राजेश जेजुरीकर, जीऑन डुबोल, लाॅईड स्टील कंपनीचे बालसुब्रमण्ययम प्रभाकरण, उद्योजक सीताराम अग्रवाल, अतूल गोयल यांचा सत्कार करण्यात आला. तर उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा व त्यांची पत्नी लीलादेवी नुवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Web Summary : Mahindra to invest ₹15,000 Cr in Nagpur for EV production. Nagpur, Nashik, and Sambhajinagar to become major auto hubs. ₹10,000 Cr deal with German company for electric three-wheelers, generating jobs. Overall, ₹7.5 lakh Cr investment in Gadchiroli, promising 5 lakh Vidarbha jobs in 5 years.
Web Summary : विदर्भ में ऑटोमोबाइल उद्योग में पहला निवेश हुआ है। महिंद्रा नागपुर में 15,000 करोड़ रुपये का निवेश करेगी। इलेक्ट्रिक वाहन और ट्रैक्टर बनेंगे। जर्मनी की कंपनी के साथ 10,000 करोड़ रुपये का समझौता हुआ है, जिससे रोजगार मिलेगा। गडचिरोली में 7.5 लाख करोड़ रुपये का निवेश हुआ है, जिससे 5 वर्षों में 5 लाख नौकरियां मिलेंगी।