‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ भावगीताने गिनीज रेकॉर्डसह रचला इतिहास! हजारो विद्यार्थ्यांची एकसुरात ‘स्वरांजली’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:12 IST2025-10-12T11:12:33+5:302025-10-12T11:12:55+5:30
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १५,४०२ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि इतकेच विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले...

‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ भावगीताने गिनीज रेकॉर्डसह रचला इतिहास! हजारो विद्यार्थ्यांची एकसुरात ‘स्वरांजली’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्वितीय आदरांजली अर्पण केली. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे...’ या विद्यापीठ गीताच्या सामूहिक गायनाद्वारे विद्यार्थ्यांनी एक सूर, एक भावना आणि एकात्मतेचा मंत्र गुंजवला आणि याच भावगीताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह चार जागतिक विक्रमांची नोंद केली.
या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी ५२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर १५,४०२ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि इतकेच विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. या विक्रमी उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाजवळील मैदानावर करण्यात आले.
विक्रमाचे प्रमाणपत्र कुलगुरूंकडे सुपुर्द
या गीतगायनातून ‘एकाच गाण्याचे सर्वाधिक सहभागी असलेले ऑनलाइन व्हिडीओ अल्बम’ म्हणून विद्यापीठाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. याशिवाय ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ या तिन्ही संस्थांनीदेखील विद्यापीठाचा विक्रम अधिकृतपणे मान्य केला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधी इमा ब्रेन (इंग्लंड) यांनी कार्यक्रमस्थळीच विक्रमाची घोषणा करत विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे आणि आयोजन समितीला प्रमाणपत्र प्रदान केले.
मानवतेचा धर्मच सर्वोच्च : नितीन गडकरी
जग संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला मानवतेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. मानवता धर्माचे अनुकरण करणे हीच राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल,
असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.