बुद्ध धम्मामुळेच समाजामध्ये अद्भूत परिवर्तन : विमल थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:05 IST2019-01-24T00:03:47+5:302019-01-24T00:05:44+5:30
बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण ज्ञानाच्या प्रकाशाशी जुळलो नसतो व त्याच अंधकारात, कर्मकांडात खितपत राहिलो असतो. मात्र बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे दलित, पीडित व वंचित समाजाला नवे जीवन मिळाले आहे. माणसाला मानूस माणणारे बुद्धाचे विचार चेतना देणारे आहेत. बुद्धामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात, समाजात अद्भूत असे परिवर्तन आले आहे, असे मनोगत ईग्नूच्या प्रा. विमल थोरात यांनी व्यक्त केले.

बुद्ध धम्मामुळेच समाजामध्ये अद्भूत परिवर्तन : विमल थोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला नसता तर आजही आपण ज्ञानाच्या प्रकाशाशी जुळलो नसतो व त्याच अंधकारात, कर्मकांडात खितपत राहिलो असतो. मात्र बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे दलित, पीडित व वंचित समाजाला नवे जीवन मिळाले आहे. माणसाला मानूस माणणारे बुद्धाचे विचार चेतना देणारे आहेत. बुद्धामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात, समाजात अद्भूत असे परिवर्तन आले आहे, असे मनोगत ईग्नूच्या प्रा. विमल थोरात यांनी व्यक्त केले.
नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने नववा बुद्ध महोत्सव बुधवारी सुरू झाला. दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्याहस्ते बुद्ध महोत्सवाचे व याअंतर्गत प्रा. विमल थोरात यांच्याहस्ते कलादालनाचे तसेच चित्रपट दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांच्याहस्ते बुद्ध फिल्म महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा. थोरात बोलत होत्या. याप्रसंगी शहर पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, स्मारक समितीचे विलास गजघाटे व एन.आर. सुटे, आयोजन समितीचे समन्वयक डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, अजय ढोक, एसबीआयच्या वीणा अर्जुने, दमक्षेसां केंद्राचे उपसंचालक पारखी, आभा बोरकर, भावना सोनवाने, अमनकुमार बागडे आदी उपस्थित होते.
प्रा. थोरात पुढे म्हणाल्या, आजही समाजातील मोठा वर्ग प्रगतीपासून मागे राहिला आहे तो सरकारच्या धोरणामुळे. दलित समाज प्रगती करू नये, असाच प्रयत्न सरकारतर्फे केला जातो. देशात सध्या अस्वस्थ व हिंसात्मक परिस्थित निर्माण केली गेली आहे. हे वातावरण संपविण्यासाठी बुद्धाच्या विचारांशिवाय पर्याय नाही. जगातील अनेक देशांमध्ये बुद्धाचे मूल्य स्वीकारले जात असून त्यांची शिक्षा आचरणात आणली जात आहे. आपणही हे तत्त्वज्ञान आचरणात आणून शोषणाच्या व्यवस्था तोडण्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी डिसीपी नीलेश भरणे यांनी विचार मांडताना, जगात सर्व लोक अनेक धर्माने आचरण करतात. जे चांगले आहे ते टिकून राहते हा निसर्गाचा नियम आहे. बौद्ध धम्मात कुणी सांगितले, परंपरेने चालत आले म्हणून मान्य करा, असे नाही. बुद्धाने कधीही मी सांगतो म्हणून मान्य करा असे म्हटले नाही. तुम्ही माझे विचार समजले, पटले व जीवनात आवडले तर स्वीकारा असाच त्यांचा आग्रह होता. त्यामुळे बुद्ध समजला की प्रेरणेसाठी इतर कुठल्याच गोष्टीची गरज उरत नाही.
त्यामुळे जगही आज त्यांच्याकडे झुकत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. दीपक खिरवडकर यांनी सत्य, अहिंसा, शांतीचा संदेश गौतम बुद्धाने दिल्याचे सांगत या महोत्सवातील कलेच्या माध्यमातून त्यांचे विचार अधिक प्रकटतेने समोर येतील, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी संचिता सोनवाने या ११ वीच्या विद्यार्थिनीने लिहलेल्या ‘बुद्धिस्ट पिलग्रीमेज थ्रु आईज ऑफ टिनेज’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
३०० विद्यार्थ्यांनी सादर केले मैत्री गीत
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस ३०० पेक्षा अधिक शाळकरी मुलांनी मैत्रीगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मृणाल थुलकर या विद्यार्थिनीने बुद्ध पुजेवर भरतनाट्यम नृत्याचे मनोरम सादरीकरण केले. माडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे झंकार बॅन्डने पहिल्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा शेवट झाला. कार्यक्रमाचे संचालन सरला वाघमारे व प्रास्ताविक प्रिया नील यांनी केले. वंदना मांडवकर यांनी आभार मानले.